ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.19 - तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून पोटच्या गोळ्यांना लहानाचे मोठे केले. ती मुले सांभाळ करीत नसल्याने संतप्त झालेल्या ७७ वर्षीय मातेने दोन मुलांविरुद्ध येथील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. अशा प्रकारचा शहरातील पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे.
बाबुलाल दादाराव घारे आणि रमेश दादाराव घारे (रा. संभाजी कॉलनी, सिडको एन-६) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कौशल्याबाई दादाराव घारे या ७७ वर्षांच्या आहेत. संभाजी कॉलनीत त्या मुलांकडे आणि सुनाकडे राहतात. घरगुती कारणावरून त्यांची दोन्ही मुले आणि सुना यांच्यात पटत नाही. दोन वर्षांपासून त्यांची दोन्ही मुले आणि सुना त्यांना त्रास देत असल्याचे समजल्याने नातेवाईकांनी मुलांची समजूत काढली होती. त्यानंतरही मुलांकडून त्यांना त्रास देणे सुरूच असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दोन ते तीन दिवसांपासून त्या गल्लीतील ओट्यावर बसून आहेत. ओट्यावरच त्या झोपतात आणि गल्लीतील लोकांनी दिलेले अन्न खातात. त्यांची दोन्ही मुले त्यांच्याजवळून जातात. मात्र त्यांना बोलतही नाहीत. काबाडकष्ट करून ज्या मुलांना लहानाचे मोठे केले. ज्यांना तळहाताच्या फोडासारखे जपले. त्यांनी केवळ वृद्धापकाळाची काठी व्हावे, एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. असे असताना ते आपल्याला सारखा त्रास देतात. ते सांभाळ करीत नसल्याने आपल्याला वृद्धाश्रमात टाकावे आणि मुलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार कौशल्याबाई यांनी सिडको पोलीस ठाण्यात केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी कौशल्याबाई यांची मुले बाबुलाल आणि रमेश यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिली. आई-वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुुसार कलम २४ प्रमाणे या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे वृद्ध मातेच्या तक्रारीवरून मुलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे.
वृद्धाश्रमात टाकण्याची मागणी-
तक्रारदार कौशल्याबाई यांनी मुले त्रास देत असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आपल्याला वृद्धाश्रमात टाकण्यात यावे, अशी विनंती पोलिसांना केली आहे. यापुढे मुलांच्या घरात राहण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.