लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोनसाखळी चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रेल्वेस्टेशन रोडवरील वॉकिंग प्लाझा येथे शतपावली करीत असलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजीबेन देवजीभाई पटेल (६३, रा. बन्सीलालनगर) या ७ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी त्या वॉकिंग प्लाझा येथे एकट्याच शतपावली करीत असताना त्यांच्या मागे-मागे चोरटा फिरत होता. तोही आपल्यासारखेच फिरण्यासाठी आला असेल म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी अचानक त्या चोरट्याने राजीबेन पटेल यांच्या गळ्यातील दीड ते दोन तोळ्याची सोनसाखळी हिसका देऊन तोडून घेतली. यानंतर तो परिसरातील झाडा-झुडपातून तारेच्या तुटलेल्या कम्पाऊंडमधून पळून गेला. यावेळी राजीबेन यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र जवळ कोणीही नसल्याने चोरट्याचे फावले. दूरवर फिरत असलेले लोक मदतीसाठी येईपर्यंत चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर त्यांनी छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. गुन्हा नोंदविला असून, पोलीस उपनिरीक्षक धनेधर तपास करीत आहेत.
वृद्धेची सोनसाखळी हिसकावली
By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST