येणेगूर : उमरगा-लोहारा तालुक्यातील परप्रांतीय विदेशी मद्याच्या विक्री पाठोपाठ आता केमिकलयुक्त शिंदीचीही गावोगावी विक्री जोमात चालू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निष्काळजीपणामुळे अवैध धंदेवाल्यांचे आयतेच फावले आहे. या दोनही तालुक्यात एकही शासनमान्य शिंदी विक्रीचे दुकान नसताना, दाळींब, मुरुम, आष्टामोड, लोहारा, जगदाळवाडी, जेवळी, आष्टा, आलुर, अचलेर आदी गावात ‘क्लोरल हायड्रेट’ या पावडरपासून शिंदी बनवून ती राजरोसपणे विक्री होत असल्याने पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वास्तविक पाहता भोसगा, भूसणी, जगदाळवाडी, मळगी आदी गावातील शिंदीची वने नामशेष झाली आहेत. पण शिंदी पिणाऱ्या शौकीनांना आता काही परप्रांतीय विक्रेते क्लोरल हायड्रेट या केमीकल पावडरपासून शिंदी तयार करुन या दोन्ही तालुक्यात विक्री करीत आहेत. एकेकाळी जिल्ह्याचे अधीक्षक सुनिल चव्हाण असताना अशा अवैध धंदेवाल्यांवर त्यांचा वचक होता. त्यांनी नागराळ शिवारात अवैधरित्या चालू करण्यात आलेला देशी दारुच्या कारखान्यावर छापा मारुन अनेकांना गजाआड केले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याला सक्षम अधिकारी न आल्याने अवैध धंदेवाल्यावर राज्य उत्पादन शुल्कचा वचक राहिलेला नाही. विशेष म्हणजे पाण्यामध्ये या केमिकलचा अतिरिक्त वापर झाल्यास पिणाऱ्यांच्या किडणीवर विपरीत परिणाम होवून ती व्यक्ती मृत्यूपंथाला लागते, असे जाणकारांचे मत आहे. तरीही राजरोसपणे हा प्रकार सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही विक्री ताबडतोब थांबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
केमिकलयुक्त शिंदीची विक्री
By admin | Updated: November 14, 2015 00:50 IST