संजय खाकरे , परळीयेथील नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे़ त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागावी यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.येथील पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आ. धनंजय मुंडे यांचा पालिकेवर एकछत्री अंमल आहे. एकूण ३२ सदस्य असलेल्या या पालिकेत सध्या भाजपाचे संख्याबळ केवळ ८ इतके आहे. काँग्रेसही राष्ट्रवादीच्या सोबत आहे. त्यामुळे पालिकेत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे. आ. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे प्रा. विजय मुंडे यांची नावे नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. मात्र, आ. धनंजय मुंडे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात? याचीच सर्वांना उत्सूकता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.नगरसेवक 'स्वीच आॅफ'नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर नाही. त्यापूर्वीच नगरसेवक सहलीवर गेले आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित सहलीवर गेले. नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे संख्याबळ असले तरी दगाफटका स्वीकारण्याची राष्ट्रवादीची तयारी नाही. त्यामुळे नगरसेवक सहलीवर निघून गेले आहेत.सहलीवर गेलेल्या नगरसेवकांचे भ्रमणध्वनी बंद आहेत़ त्यामुळे नेमक्या राजकीय हालचाली काय आहेत हे कळण्यास मार्ग नाही़दावे-प्रतिदावेपरळीचा नगराध्यक्ष होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे़ तूर्त नगरसेवकांचे समर्थक दावे-प्रतिदावे करु लागले आहेत़ मात्र नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत कोण बसणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे़विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वजिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानल्या गेलेल्या परळीचा नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आ़ धनंजय मुंडे ठरवतील तोच नगराध्यक्ष होणार आहे़ त्यामुळे इच्छुकांनी आपापल्या परीने नगराध्यक्ष पदासाठी राजकीय कौशल्य पणाला लावले आहे़
परळीत नगराध्यक्ष पदासाठी चुरस
By admin | Updated: July 10, 2014 00:58 IST