औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी साडेचार कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी छावणी परिषदेचा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मनपात धाव घेऊन महिनाभरात थकबाकीची रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी छावणीचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महानगरपालिकेने जायकवाडीपासून शहरापर्यंत जलवाहिनी टाकलेली आहे. याच जलवाहिनीतून मनपाने छावणीसाठी स्वतंत्र कनेक्शन दिलेले आहे. त्याद्वारे छावणी परिषद त्यांच्या हद्दीतील सुमारे २० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करते. मनपाकडून छावणी परिषदेला हे पाणी विकत दिले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून छावणी परिषदेने मनपाकडे पैशांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे छावणी परिषदेकडे ४ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. तिच्या वसुलीसाठी मनपाने दोन महिन्यांत छावणी परिषदेला दोन नोटिसा दिल्या; परंतु छावणी परिषदेने थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोमवारी सकाळीच मुख्य जलवाहिनीद्वारे छावणी परिषदेला होणारा पुरवठा बंद केला. या कारवाईनंतर छावणी परिषदेच्या मुख्याधिकारी पूजा पालेचा आणि लष्कराचे एक अधिकारी तातडीने मनपात दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. महिनाभरात थकबाकी भरण्याचे आश्वासन परिषदेच्या वतीने यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर दुपारी पुन्हा छावणीचा पुरवठा सुरू करण्यात आला.
थकबाकी वसुलीसाठी छावणीचे पाणी कापले
By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST