औरंगाबाद : जगभरात शांतता नांदावी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागला. यंदा तरी मुसळधार पाऊस येऊ दे अशी विशेष ‘दुआ’ गुरुवारी छावणीत लाखो भाविकांनी ईदच्या विशेष नमाजप्रसंगी केली. मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघत आहे. यंदा जून महिना उलटला तरी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. या गंभीर परिस्थितीतून राज्याला बाहेर काढ अशी दुआ मौलाना हाफेज जाकेर यांनी केली. ईदच्या नमाजसाठी उपस्थित लाखोंच्या जनसागराने ‘आमीन’म्हणत याला दुजोरा दिला. विश्वशांतीसाठीही त्यांनी दुआ केली. यावेळी भाविकांचे डोळे पाणावले होते. ईद-उल-फित्रनिमित्त पारंपरिक पद्धतीने नमाज अदा औरंगाबाद : गेला महिनाभर रोजे, पवित्र कुराण शरीफचे क्रमश: वाचन, धार्मिक प्रवचनांचे श्रवण, दानधर्म (खैरात) करणे, अशा धार्मिक वातावरणात मुस्लिम भाविकांनी रमजान महिना व्यतीत केला. गुरुवारी छावणी, उस्मानपुरा, रोजाबाग व शाह शोख्तामियाँ ईदगाह आणि शहरातील सर्वच मशिदींमध्ये ईद-उल-फित्रची नमाज भक्तिभावाने अदा करण्यात आली. सकाळपासूनच पावसाच्या सरींचा वर्षाव होत असतानाही लाखोंच्या संख्येने भाविक छावणी येथील मुख्य ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यासाठी हजर झाले. सकाळी ९.३० वाजता नमाजची वेळ जाहीर करण्यात आली होती. ९.४० वाजता नमाजला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने ईदगाहकडे भाविक येतच होते. पीईएस सोसायटीच्या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे भाविकांनी नमाज अदा केली. जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीर साहब यांच्या मार्गदर्शनात नमाज भक्तिभावे अदा करण्यात आली. मुख्य नमाजपूर्वी मौलाना नसीम मुफ्ताही, मौलाना महंमद इलियास व झियाउद्दीन सिद्दीकी यांनी प्रास्ताविक प्रवचन केले. त्यात त्यांनी पवित्र रमजान महिना, रोजे, खैरात-फितरा, नमाज आणि कुराण शरीफचे पठण यांचे महत्त्व विशद केले. नमाजच्या वेळी हैदराबाद येथील ‘आयपीएस’ ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी खास ईदची नमाज, त्यासाठीचा पोलीस बंदोबस्त व इतर व्यवस्था पाहण्यासाठी खास बसद्वारे ईदगाहमध्ये आले होते. नमाजनंतर भाविकांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी ईदगाहमध्ये भाविकांसाठी जागा कमी पडत आहे. यंदाची अलोट गर्दी पाहून पुढच्या वर्षी आयोजकांना आणखी जागा वाढवावी लागणार आहे. ईदगाह कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष शेख रजवी शेख अली, सचिव अब्दुल हमीद खान, सहसचिव इकबाल खान दादे खान, सदस्य अब्दुल वहीद, शेख कासीम, रफीक अहेमद, अश्फाक खान हमीद खान, अकबर खान इकबाल खान, शेख अझर शेख वहीद यांनी ईदगाहची सफाई आणि रंगरंगोटी करून महापालिकेच्या सहकार्याने पाण्याची आणि भाविकांच्या बैठकीची तसेच नमाजनंतर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मुस्लिमेतर मान्यवरांच्या बैठकीची व्यवस्था केली. मान्यवरांकडून शुभेच्छा ईदगाह मैदानाच्या परिसरात वक्फ बोर्डातर्फे पेंडॉल लावण्यात आला होता. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे आणि वसंत परदेशी, माजी आ. एम.एम. शेख आणि नामदेवराव पवार, माजी महापौर रशीदखान (मामू), मनमोहनसिंग ओबेरॉय, पंकज फुलफगर, डॉ. जफर खान, शेख युसूफ मजीदुल्ला बर्कतुल्ला, जेम्स अंबिलढगे, अशोक सायन्ना, बाबा तायडे, मतीन अहेमद, अॅड. सय्यद अक्रम आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहरात ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: July 7, 2016 23:55 IST