तुळजापूर : संबळ, बँडच्या वाद्यात व शंखाच्या निनादात आई राजा उदो उदोच्या गजरात श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेयी महंत तुकोजीबुवा, भोपी पुजारी संजय उदाजी, महंत हमरोजीबुवा यांनी अग्नी देवून होळी प्रज्वलीत केली. उपस्थितीत भाविकांनी बोंब मारून होळीस प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले व यानंतर शहरातील ठिकठिकाणच्या होळी पेटविण्यात आल्या. बुधवारी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त सायंकाळची देवीची अभिषेक पूजा सहा वाजता सुरू करण्यात आली. तर साडेसात वाजता अभिषेक पूजा होवून नित्योपचारपणे धुपारती, अंगारा आदी धार्मिक विधी पार झाले. यानंतर भोपी पुजारी संजय उदाजी, महंत तुकोजी, महंत हमरोजी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, भोपी अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पुजारी मंडळाचे संचालक सुधीर रोचकरी, शशिकांत पाटील यांनी संबळाच्या वाद्यात होमासमोरील होळीजवळ येवून प्रथम पूजन केले व त्यानंतर आरती करण्यात आली. तत्पूर्वी अनेक भाविकांनी देवीस व होळीला नैवेद्य दाखविले. त्यानंतर सेवेकरी अंबादास औटी यांनी मातंगे देवीसमोरील होळीतून अग्नी आणून तो भोपी पुजारी, महंत यांच्याकडे सुपूर्द केला व त्याच अग्नीने महंत ुकोजी, महंत हमरोजी व भोपी संजय उदाजी यांनी होळी प्रज्वलीत केली. यावेळी भाविकांनी व पुजाऱ्यांनी आई तुळजाभवानीचा जयघोष केला व दर्शन घेतले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, विश्वस्त तेजस चव्हाण, तहसीलदार काशिनाथ पाटील, भोपी पुजारी जगदिश पाटील, रुपेश परमेश्वर, पिंटू परमेश्वर, पुजारी कुलदीप मगर, धीरज भैय्ये, सेवेकरी, छत्रे, चोपदार, पलंगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
तुळजाभवानी मंदिरात होळी सण उत्साहात
By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST