लातूर : लातूर पंचायत समितीच्या तीन मजली इमारतीत कॅमेरे बसविण्यासाठी गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी अडीच लाखांचा कृती आराखडा बनविला आहे़ हा प्रस्तावीत आराखडा पंचायत समितीच्या बैठकीत मंजूर केला जाणार आहे़ लातूर जिल्हा सर्व क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख ‘लातूर पॅटर्न’ म्हणून केली आहे़ यात नेहमीच नवनवीन संकल्पना पुढे येताना दिसून येतात़ जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी जिल्हा परिषदेत सर्व विभागात तसेच अधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फिरण्याला ब्रेक लावला होता़ तसेच कार्यालयात काय चालू आहे़ कर्मचारी नेमके काय करतात हे दिसत असल्यामुळे प्रशासनास गती मिळाली होती़ त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी २ हजार रुपये गोळा करून २०१४ मध्ये आपल्या विभागात कॅमेरे बसविले आहेत़ यासर्व विभागाचे पाहून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांंनी पंचायत समितीत येणाऱ्या व जाणाऱ्यांची ओळख, तसेच कार्यालयात कर्मचारी काय करतो आहे, यावर अंकुश ठेवण्यासाठी पंचायत समितीच्या तीन मजली इमारतीतील शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, पंचायत विभाग, वित्त विभाग, नरेगा (रोजगार हमी) विभाग यासर्व विभागांत कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ या प्रत्येक विभागातील अधिकारी कक्ष, कर्मचारी कक्ष, सभापती कक्ष यांच्यासह पंचायत समितीमधील आवारातही कॅमेरे बसविले जाणार आहेत़ यासाठी एकूण ४८ कॅमेरे बसविले जाणार आहे़ याचा प्रस्तावीत आराखडा बनविण्यात आला आहे़ सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)पंचायत समितीत कॅमेरे बसवातेत, यासाठी अडीच लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे़ याला बैठकीत मंजुरी मिळताच काम सुरु केले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी दिली़
पंचायत समितीवर ‘सीसीटीव्ही’ची नजर !
By admin | Updated: January 9, 2015 00:51 IST