शेख शहारुख शेख हनिफ (२६, रा. अजिम कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, टाऊन हॉल येथे एक जण नशेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याने सिटी चौक पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोहित गांगुर्डे, हवालदार आप्पासाहेब देशमुख, दिलीप मोदी, संजय नंद, संदीप तायडे आणि ताठे यांनी सापळा रचून संशयित आरोपी शेख शहारुखला ताब्यात घेतले. औषधी निरीक्षक जे. डी. जाधव यांच्या समक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ निट्रोसन- १० या औषधी गोळ्यांच्या ३० स्ट्रिप आढळून आल्या. यात एकूण ३०० गोळ्या होत्या. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या जवळ बाळगणे गुन्हा आहे. या गोळ्या नशेखोरांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. याविषयी फौजदार गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला.
नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणारा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:04 IST