कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे स्वस्त धान्य दुकानदाराने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गावातील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्षासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यांच्या शोधात पोलिस पथक पाठविले आहे. शनिवारी या गावास डीवायएसपी पियूष जगताप यांनी भेट दिली. खांबाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार मयत सटवा कचरू हाटकर यांना गावातील मंडळी गेल्या दोन महिन्यांपासून स्वस्त धान्यावरून वाद घालून सप्ताहासाठी धान्याच्या मालाची मागणी करीत होते. हे प्रकरण गेल्या महिन्यात तहसीलदारपर्यंत गेले होते. तेव्हा प्रतिबंधक कार्यकाही केल्याचे कुरूंदा पोलिसांनी सांगितले. हा वाद थांबण्याऐवजी उलट वाढत गेल्याने स्वस्तधान्य दुकानदार सटवा हाटकर यांनी १० मार्च रोजी जाळून घेतले. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयताची पत्नी शकुंतलाबाई यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरूद्ध अॅट्रॉसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस पथकाने आरोपीच्या शोधामध्ये गाव व आखाडे पिंजून काढले मात्र ते हाती लागले नाही. घटना घडून गेल्यानंतर महसूल प्रशासन आता गंभीर झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनीही गावात दोन कर्मचारी ठेवले होते. (वार्ताहर)तहसीलदार नांदे यांची भेटखांबाळा येथे स्वस्त धान्याच्या वादातून दुकानदार सटवा हाटकर यांनी आत्महत्या केल्याने शनिवारी ४ वाजण्याच्या सुमारास वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी भेट दिली. तहसीलदार नांदे यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मंडळ अधिकारी अंभोरे, तलाठी मेहत्तरे आदींची उपस्थिती होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहूून तहसील प्रशासनाने खांबाळा येथे भेट दिली.
खांबाळा प्रकरणी पोलिस पथक आरोपींच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 14:25 IST