आशपाक पठाण / बाळासाहेब जाधव , लातूरवाहतुकीला शिस्त लागावी म्हणून बसविण्यात आलेले सिग्नल सध्या शोभेच्या वस्तू बनले आहेत़ ९ पैकी ७ सिग्नल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत़ प्रमुख चौकातील रहदारीच्या ठिकाणीच सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीची समस्या भेडसावत आहेत़ त्यातच वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे लक्ष भलतीकडेच असल्याने शहर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सोमवारी लोकमत चमूने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये वाहनधारक व वाहतूक शाखेच्या पोलिसांचा बिनधास्तपणा दिसून आला़ वाहनधारक एवढे सुसाट असतात की, त्यांना अपघाताचीही भिती नाही़ विशेष म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींची वाहने सुसाट असतात़ अशोक हॉटेल चौक, मिनी मार्केट या दोन चौकांतील सिग्नल्स सोमवारी सुरू असल्याचे दिसून आले.सोमवारी दुपारी १२़१५ वाजता लोकमत चमूने पाच नंबर चौकात पाहणी केली असता सिग्नल बंद होते़ कधी तरी सिग्नल सुरू असतात अशी माहिती तेथील व्यावसायिकांनी दिली़ सिग्नल बंद का? यावर ते म्हणाले, चौकात मोठ्या वाहनांना वळण घेण्यासाठी वेळ लागतो़ ४जागा अपुरी असल्याने लवकर वळण बसत नाही़ सिग्नलची वेळेत ते वाहन पास होत नाही़ त्यामुळे इतर वाहनधारक ताटकळतात़ वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिग्नल कधी कधी बंद असल्याचे बाजूच्या व्यावसायिकांनी सांगितले़ कोण कोठून कसा येतोय, कसा जातोय याची कसलीही काळजी पोलिसांना नव्हती़ तेवढ्यात घाई घाईत आलेले वाहतूक पोलीस म्हणाले, सर्व काही सुरळीत आहे म्हणतच त्यांनी एक दोन रिक्षा चालकांना उगाचच दाब दिल्यासारखे करून चौकातून वाहने पुढे हाकलली़ त्यानंतर ते आपल्या कामाला लागले.४12.31 च्या दरम्यान शिवाजी चौकात पोहचल्यावर तिथे एकच वाहतूक शाखेचा एकच कर्मचारी हातवारे करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होता़ मात्र, भली मोठी गर्दी एकट्याला रोखणे शक्य नव्हती़ चौकाच्या चारही कोपऱ्यात आॅटोरिक्षांचा गर्दीतच थांबा़ त्यामुळे इतर वाहनधारक मार्ग काढीत निघाले होते़ सिग्नल नाही, वाहनांना थांबण्यासाठी मारण्यात आलेले पांढरे पट्टे ओलांडत काही वाहनधारक पुढे आलेले होते़ कोणाला रोखणार, त्यामुळे वाहतूक पोलिस गप्पच होते़ आपण एकटेच का? एवढ्या मोठ्या चौकात, अशी विचारणा केल्यावर त्यांनी आणखी दोघे असल्याचे सांगितले़ एक कर्मचारी बार्शी रोडवरील कोपऱ्यात रिक्षाचालकासोबत गप्पा मारत थांबला होता़ तर दुसरा कर्मचारी औसा रोडवर उड्डाणपुलाच्या खाली थांबून वाहनांच्या हालचाली पाहत थांबला होता़ समांतर रस्त्यावरची गर्दी, शिवाजी चौकातून औसा रोडकडे निघालेल्या वाहनांची मोठी रिघ असतानाही वाहतूक शाखेचा हा कर्मचारी बिनधास्त होता़ 2.00 वाजण्याच्या सुमारास आशोक हॉटेल चौकात वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी चौक सोडून जवळपास दीडशे फुट पुढे उभे होता़ रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाशी त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या़ चौकात कुणी नसल्याने सिग्नल पडण्याआधीच काही वाहनधारक निघून गेले़ वाहतूक नियंत्रकच नसल्याने वाहनधारकही बिनधास्त निघाले होते़ रमा चित्रपट गृहाकडून आलेल्या वाहनांच्या गर्दीतील एक मोटारसायकलवाला हेरून या वाहतूक शाखेच्या पोलिसाने त्याच्यावर जणू झडपच घातली़ इकडे सिग्नलवर वाहतूक सुरू होती़ सिग्नल सुरू असल्याने की काय, दूरवर उभे राहून गप्पा रंगल्या होत्या़ गुळ मार्केट चौकात दुपारी १़२० वाजता मोठा ट्रक चौकातून गुळ मार्केटकडे निघाला़ ट्रक नो एन्ट्री घुसल्याचे पाहून वाहतूक शाखेचा कर्मचारी चौकातील खोळंबलेली वाहतूक सोडून त्या ट्रकच्या मागे पळत सुटला़ या भागातील सिग्नल गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे एका दुकानचालकाने सांगितले़ पाच ते सहा रस्ते चौकाला मिळत असल्याने रहदारी मोठी आहे़ वाहतूक शाखेचे पोलिस दिसत नसल्याने ट्रकच्या पाठीमागे लोकमत प्रतिनिधीही गेले असता ट्रकच्या क्लिनरसोबत नियम तोडल्याची चर्चा सुरू होती़ चौक सोडून तब्बल दोन ते अडीचशे फुट पुढे येऊन पोलिस कर्मचारी कारवाई करीत होता़ साब, खाने को पैसे नई, हमे यहाँ के ब्यापारीने बोला उधर से जाओ, इसलिए आए़ मला काहीच माहित नाही़ दंड भर निघून जा, नाही तर पोलिस ठाण्यात गाडी घे, असा दम पोलिसांनी दिला़ त्यावर उपस्थित एका हमालाने तडजोडीचा सल्ला त्या आंध्रप्रदेशातील ट्रकचालकाला दिला़ वाहतूक शाखेचा पोलिस श्रेयश तांदुळ विक्रीच्या दुकानात बसला़ लोकमत प्रतिनिधीने ते छायाचित्र टिपले असता एका आॅटोचालकाने ही बाब त्या पोलिसाला सांगताच तावातावाने आलेले कर्मचारी मोहन शिंदे यांनी फोटो का काढली, अशी विचारणा केला़ पत्रकार असल्याचे सांगताच पुन्हा कारवाईची कहानी त्यांनी सांगितली़
वाहनधारक अन् पोलिसही बिनधास्त !
By admin | Updated: December 30, 2014 01:17 IST