वाटूरफाटा: गोसावी पांगरीकडे वळणाऱ्या ट्रकवर पाठीमागून कार धडकल्याने पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जालना- मंठा रस्त्यावर एदलापूर फाट्यावर झाला. सर्व जखमींना जालना येथे एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ट्रक क्रमांक एम.एच.२१- ६१९९ व कार क्रं. एम.एच २६- ए.के. ३६०४ हे दोन्ही वाहने जालन्याकडून येत होते. एदलापूर पाटी जवळ ट्रक पांगरी गोसावी गावाकडे वळत असताना पाठीमागून येणारी कार ट्रकवर धडकली. यात कैलास राठोड, धोंडीबा चव्हाण, शहाजी राठोड, सुनील राठोड, संतोष राठोड (सर्व रा. माळतोंडी ता. लोहा जि. नांदेड ) हे पाचजण जखमी झाले. जखमींना जालना येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांनी व पोलिसांनी तात्काळ मदतकार्य करून सर्व जखमींनी उपचारासाठी रूग्णालयात हलविले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातामुळे महामार्गावरील एकतर्फी वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
कार ट्रकवर धडकली, पाच गंभीर
By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST