बीड : कौटुंबिक कलहानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या आ. क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसोबतच राहणार आहे,’ असे स्पष्ट करुन आपले माप डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पारड्यात टाकले. विकासाचे मुद्दे नसलेले वेगवेगळा आधार घेत असतात;परंतु विकासाच्या अजेंड्यावर आपण जनतेत मते मागण्यासाठी जाणार आहोत, असे स्पष्ट करुन त्यांनी बीड जिल्ह्यासह राज्यात राकॉ उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहे, असे सांगून तर्क वितर्कांनाही पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी आ. उषा दराडे, मोईन मास्टर, नसीमोद्दीन इनामदार, हेमा पिंपळे, अजिंक्य चांदणे, प्रिया डोईफोडे, विलास बडगे, अरुण डाके, दिनकर कदम, खमर अली खान, डॉ. योगेश क्षीरसागर, विलास विधाते उपस्थित होते.यावेळी आ. क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विकासाच्या मुद्यावर जनतेने आजवर साथ दिली आहे. यापुढेही ही साथ अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. वाढत्या शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते. करवाढ न करता आहे त्या आर्थिक परिस्थितीत पालिकेचा कारभार सक्षमपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षात राहून केंद्र व राज्याचा निधी विकासासाठी मंजूर करून आणला. दुष्काळामुळे शेजारचे सर्व जिल्हे पाण्यावाचून तहानलेले होते; परंतु बीडमध्ये टँकरची गरज भासली नाही, दूरदृष्टी ठेवून विकास केल्याचा जनतेला पुरेपूर फायदा झाला. बिंदुसरा नदीपात्रात नवीन पुलाची उभारणी होईल. तूर्त बायपासचे काम पूर्णत्वाकडे गेलेले असून, हा बायपास लवकरच खुला करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. स्टार प्रचारक म्हणून मला बीडसोबतच राज्यातही फिरावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चर्चा शिवसंग्राममध्ये;माघार राष्ट्रवादीतडॉ. दिलीप खरवडकर यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अराजकीय चेहरा म्हणून डॉ. खरवडकर यांच्या नावाची शिवसंग्रामतर्फे नगराध्यक्षपदासाठी चर्चा झाली होती. मात्र, गुरुवारी पत्रकार परिषदेत डॉ. खरवडकर यांनी विकासाच्या मुद्यावर उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. डॉ. क्षीरसागर यांना बिनशर्त पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राकाँचा उमेदवार तो माझा उमेदवार
By admin | Updated: November 11, 2016 00:18 IST