औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मागील काही दिवसांपासून महापालिकेत बैठकांचे जोरदार सत्र सुरू आहे. दुसरीकडे ऐतिहासिक वारसा नामशेष करण्याचे कामही मनपाकडून सुरू आहे. मंगळवारी सकाळी फाजलपुरा येथील ऐतिहासिक नहर मनपाच्या कंत्राटदाराकडून फोडण्यात आली. कंत्राटदार एवढ्यावरच थांबला नाही, तर ३०० वर्षे जुना पूलही पाडून टाकला. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत काम बंद पाडले.मनपातर्फे शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्त्यावर फाजलपुरा येथील नाल्यात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. नियोजित आराखड्यानुसार पुलाच्या बाजूने लाईन टाकण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. या कामात ड्रेनेजचे पाईप कमी लागावेत या हेतूने कंत्राटदाराने जेसीबी आणि बस्टरच्या साह्याने पुलाची तोडफोड सुरू केली. अगोदर ऐतिहासिक नहर फोडण्यात आली. त्यानंतर पुलाचा काही भागही पाडण्यात आला. या घटनेनंतर नहरचे पाणी नाल्यात धो-धो वाहू लागले. परिसरातील नागरिकांना नहर फोडल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंत्राटदाराचे काम थांबविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मनपाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी सिद्दीकी यांनाच धारेवर धरले. काही नागरिकांनी तर शिव्यांची लाखोलीच वाहिली. कंत्राटदाराने नियोजित प्लॅननुसार काम केले नसल्याचा निर्वाळा सिद्दीकी यांनी दिला. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नहर फोडली, पूल पाडला!
By admin | Updated: November 9, 2016 01:36 IST