औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रे देण्यास अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे परिषदेच्या निवडणुका यावेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रांवर घेण्यात येणार आहेत. परिषदेच्या सात वार्डांसाठी एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. परिषदेची याआधीची निवडणूक २००८ साली झाली. तोपर्यंतच्या सर्वच निवडणुका पारंपरिक पद्धतीने म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच घेण्यात आल्या. मात्र, अलीकडच्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवून छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा वापर करण्याची परवानगी मागितली होती; परंतु आयोगाने तेव्हा नकार दिला. त्यामुळे ही निवडणूक मतपत्रिकांचा वापर करूनच घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता आयोगाने आपली मतदान यंत्रे वापरण्यास परवानगी दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर होणार आहे. छावणीत सात वॉर्डांत १६ मतदान केंद्रे आहेत.
छावणीच्या निवडणुका मतदान यंत्रांवरच होणार
By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST