अंबड : वाळू माफियांविरोधात तालुका महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर तहसीलदार महेश सावंत यांनी कारवाई केली. यापैकी दोन वाहनांच्या मालकांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास तहसीलदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची दोन पथके अंबड येथून गोदापात्राकडे रवाना झाली. दोन्ही पथके वेगवेगळया मार्गांनी गोदापात्राशेजारील रस्त्यांनी गस्त घालत होती. रात्री २ वाजेच्या सुमारास पथकाला बळेगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन जात असलेली चार वाहने दिसली. महसूल पथकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एम.एच.२६-ए.डी.७७ व एम.एच.२३-डब्ल्यू. १९५० या दोन हायवा वाहनचालकांनी पथकाबरोबर मुजोरी करत तेथुन पळ काढला. यावेळी पथकाने अन्य दोन वाहने ( एम.एच.१२-एफ.झेड.७५३५) व एम.एच.२०-डी.ई.०८६४) ताब्यात घेऊन त्यांना प्रत्येकी २० हजार ४०० रुपयांप्रमाणे एकूण ४० हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली. यानंतर गोंदीचे मंडळ अधिकारी के.एस.ऐडके यांच्या तक्रारीवरुन दोन्ही फरार वाहनांचे मालक बाळू राठोड व शिवाजी खंड (रा.औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)मंठा/तळणी : पूर्णा नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून दुधा येथे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफिया टोळीतील १२ जणांना मंठा तहसीलदारांनी चार दिवसांपूर्वी ७५ लाखांचा दंड ठोठावला होता. दंडाची ही रक्कम २ फेबु्रवारी २०१५ पर्यंत भरणा करावी, अशी मुदत वाळूमाफियांना पाठविलेल्या नोटिसमध्ये करण्यात आली होती. मात्र त्यांनी दंडाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांना आणखी एक दिवसाची संधी देण्यात आली. परंतु आजही हा भरणा झाला नाही. याबाबत मंठा तहसीलदार छाया पवार म्हणाल्या, दंड भरणा करण्याच्या मुदतीत १ दिवसाची वाढ करण्यात आली. ३ तारखेच्या दुपारी ३ वाजेपर्यंत दंड भरण्याची संधी देण्यात आली. परंतु तरीही दंड वसूल झालेला नाही. आज मी रजेवर आहे, त्यामुळे कार्यवाही होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले.
अंबडमध्ये वाळूमाफियांविरूध्द मोहीम
By admin | Updated: February 4, 2015 00:39 IST