लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबादेतील जमिनीवर सातत्याने अतिक्रमणाचे प्रयत्न झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या नावे असलेली नागसेनवन परिसरातील संपूर्ण जमिनीची मोजणी करून द्यावी, ज्यामुळे जमिनीला कुंपण घालणे सोपे होईल, अशी भूमिका रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आनंदराज आंबेडकर औरंगाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची घटना स्वत: बाबासाहेबांनी तयार केली होती. सोसायटीच्या घटनेनुसार अकरा सदस्यांच्या कार्यकारी मंडळाला मान्यता आहे. यापैकी ७ जण बौद्ध आणि ४ जण खुल्या प्रवर्गातील असावेत. संस्थेचा चेअरमन हा बौद्ध असावा आणि उपाध्यक्ष हा खुल्या प्रवर्गातील असावा, अशी रचना स्वत: बाबासाहेबांनीच केली आहे. त्यानुसार अॅड. प्रीतमकुमार शेगावकर यांच्या निधनानंतर पीईएसचे सदस्य व्ही. एम. प्रधान, डॉ. एस. एल. भागवत, डॉ. डी. जी. देशकर आणि डॉ. मानगुटकर यांनी २०१२ मध्ये आपली सदस्य व चेअरमनपदावर निवड केली. आज रीतसर मीच पीईएसचा चेअरमन आहे, असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला. पीईएसच्या जागेवर अनेकदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. नागसेनवन परिसरात यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची आपण काळजी घेणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जागेची मोजणी करून देण्याची विनंती करणार असून, त्यानंतर संस्थेच्या संपूर्ण जागेला कुंपण घातले जाईल, असेही ते म्हणाले.यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे म्हणाले की, कसेल त्याची जमीन, या कायद्याप्रमाणे मराठवाड्यातील गायरान जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. गायरान जमिनी नावे करून देण्यात याव्यात, यासाठीचे ३० ते ३५ हजार प्रस्ताव विभागातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. या प्रस्तावाकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने लवकरच विभागीय आयुक्तालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बंडू प्रधान, के. व्ही. मोरे, प्रा. विजय घोरपडे, प्रशांत म्हस्के, रमेश सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
पीईएसच्या जागेची मोजणी करून द्या
By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST