व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्हा परिषदेमार्फत झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप झाल्यानंतर नेमलेल्या समितीला चौकशीसाठी अधिकारी सहकार्य करीत नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे़ जि़ प़ मधील मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांच्यासह इतर अधिकारी समिती येण्यापूर्वीच कार्यालयातून पळ काढत आहेत, अशी माहिती समितीतील सूत्रांनी दिली़बीड जिल्हा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेतील झेडपीआर, तेरावा वित्त आयोग, दलित वस्ती विकास योजना या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता़ चौकशीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते़ त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सहा तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. १५ आॅगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना होत्या़ मात्र समितीला जिल्हा परिषदेतील लेखा विभागातील रजिस्टरच संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे अद्यापपर्यंत चौकशी समितीच्या हाती काहीच लागलेले नसल्याचे देखील सूत्रांनी सांगितले़मंगळवार व बुधवारी चौकशी समितीचे सदस्य चौकशीसाठी सीईओंच्या दालनात गेले होते. दोन्ही दिवशी सीईओ राजीव जवळेकर कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. यामुळे चौकशी समितीचे सदस्य पूर्णत: वैतागले होते. शेवटी चौकशी समिती सदस्यांनी ज्या कार्यालय अंतर्गत कामांची चौकशी करायची आहे त्या कार्यालयात अर्धा तास ठिय्या मांडल्याचा अहवाल बनविलेला आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी चौकशी समितीला सहकार्य केले नाही तर आम्ही तसा अहवाल वरिष्ठाकडे पाठविणार आहोत, असे समितीतील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़ चौकशीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
कॅफोंचे असहकार्य !
By admin | Updated: August 15, 2014 01:36 IST