लातूर : लातूर तालुक्यातील सावरगांव येथील शेतकऱ्याने लावलेल्या ५ एकर शेतातील काकडी कडू निघाल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच कृषी विभागाने याची दखल घेतली आणि तालुकास्तरीय समितीकडून क्षेत्रपाहणी व पंचनामा केला. नुकसान भरपाईसाठी जिल्हा ग्राहक मंचाकडे जाण्याचा सल्लाही या समितीने दिला आहे़लातूर तालुक्यातील सावरगाव येथील कोंडूळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात एका नामांकीत कंपनीच्या काकडीची बियाणाची लागवड केली होती़ मात्र लागवड करण्यात आलेली ५ एकरातील सर्व काकडी कडू निघाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले़ याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच कृषी विभाग खडबडून जागा झाला़ कृषी विभागाच्या तालुकास्तरीय समितीने क्षेत्रीय पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष उप विभागीय कृषी अधिकारी आऱटी़ मोरे, तालुका कृषी अधिकारी के़बी़माने, कृषी महाविद्यालयातील तज्ञ डॉ़ जगताप, समिती सदस्य संजय माने यांनी सावरगाव येथे कोंडूळे यांच्या शेतात जाऊन क्षेत्रीय पाहणी केली़ ५ एकर शेतातील काकडीचा पंचनामाही केला. शेतात लागवड करण्यात आलेली काकडी कडू असल्याचे वास्तव असून याबाबतचा क्षेत्रीय अहवाल व पंचनाम या समितने करून शेतकऱ्याला दिला. तसेच समितीचा सदर अहवाल कृषी विभागाकडे दाखल करण्यात आला असून, तालुका समितीने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा ग्राहकमंचाकडे दाद मागण्याचा सल्लाही दिला आहे़ दरम्यान, पंचनाम्यात समितीने कंपनीवर ताशेरे ओढले आहेत. (प्रतिनिधी)शेतकऱ्याने शेतात चांगले उत्पन्न येईल, या आशेवर काकडीची लागवड केली़ काकडी चांगली आली पण ती कडू निघाली. कृषी विभागाकडे तक्रार केली असता, त्यांच्याकडून केवळ क्षेत्रीय पाहणी व पंचनामा करून शेतकऱ्याचे डोळे पुसले. आता ग्राहक मंचातच शेतकऱ्याला दाद मागावी लागणार आहे. त्यानंतरच नुकसानभरपाई मिळेल.
नुकसान भरपाईसाठी ग्राहकमंचाकडे़़़ समितीकडून काकडीचा पंचनामा
By admin | Updated: May 12, 2015 00:50 IST