लातूर : लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीत दुष्काळाचे कारण पुढे करून काँग्रेसने माघार घेतली आहे़ निवडून येणाऱ्या सदस्याला ८ ते ९ महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार असल्याने खर्च करायचा कशाला? असा प्रश्न इच्छुकांनाही पडला आहे़ परिणामी, फारसा उत्साह नसलेल्या या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे़ अर्ज दाखल करण्यासाठी २९ मार्च शेवटची तारीख आहे़काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांनी प्रभाग क्ऱ ११ ब मधून राजीनामा दिल्याने या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे़ २९ मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे़ दुष्काळ, पाणीटंचाईमुळे पोटनिवडणूक घेऊच नका, अशी मागणी प्रभागातील काही नागरिकांनी केली असली तरी आता कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे़ काँग्रेसची जागा असतानाही पाणीटंचाईचे कारण पुढे करीत त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्याचे घोषित केले आहे़ शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे, पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, यासाठी प्रभागातील नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी महापालिका, निवडणूक आयोगाकडे निवेदन आहे़ काँग्रेस पक्ष नेहमीच अडचणीच्या काळात नागरिकांसोबत असतो, सध्या शहरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई यामुळे नागरिक त्रस्त आहेत़ अशा परिस्थितीत निवडणूक नको, म्हणून माघार घेण्यात येत आहे़ तर दुसरीकडे शिवसेना, भाजपाने स्वतंत्रपणे लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे़ राष्ट्रवादीचे मात्र अद्याप तळ्यात-मळ्यात आहे़ राष्ट्रवादीची पुढील दोन दिवसांत बैठक होऊन निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)
पोटनिवडणुकीतून काँगे्रसची माघार !
By admin | Updated: March 23, 2016 01:07 IST