व्यंकटेश वैष्णव , बीडभूमाफियांच्या पाठीशी चक्क अधिकारीच उभे रहात असल्याने कारवाई तर दूर मात्र खरेदी-विक्री झालेल्या जमीनीचे खासरा पत्रक जर मागीतले तर मिळत नसल्याचे चित्र बीड तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात पहावयास मिळत आहे.नामलगाव येथील देवस्थानच्या नावे व गायराण असलेली जमीन लाटणारी टोळी सक्रीय आहे. गायराण व इनामी जमीनींचे बोगस सातबारे बनवायचे अन् जमिनी लाटायच्या हा उद्योग अधिकारी, गाव तलाठी यांच्या कृपा अशिर्वादाने सध्या तेजीत चाललेला आहे. यात जमीन एकत्री करणाच्या नावाखाली भूमी अभिलेख कार्यालयाने अधिकार नसतानाही नामलगाव येथील सर्वे नंबर ३३ व गट नंबर २२ या क्षेत्राला वैयक्तीक लाभार्थ्याचे नाव लावून त्याची खरेदी-विक्री झाली आहे. या प्रकारामुळे धनदांडग्याना बळ मिळत असल्याचा आरोप नामलगाव देवस्थानचे विश्वस्त मुकुंद शेळके यांनी केला आहे.देवस्थानांच्या जमीनी बेकायदेशीर हस्तांतरीत झाल्या प्रकरणही जिल्हा प्रशासनच गंभीर नसल्याचे वेळोवेळी पहावयास मिळत आहे. उप विभागीय अधिकारी यांच्या स्तरावर याबाबत कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हयातील व शहरातील अधिकाऱ्यांच्या कृपेनेच भूखंड धनदांडग्यांच्या घशात घातल्या जात असल्याच्या तक्रारी प्रशासन दरबारी आहेत.उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला नाही भ्रमणध्वनीबीड जवळील नामलगाव येथील बेकायदेशीर जमीन हस्तांतर झाल्या प्रकरणी विचाण्यासाठी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी यांना दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. यामुळे प्रशासनाची याबाबतची बाजू कळू शकली नाही.तहसील अभिलेख कक्ष तपासा , सत्य समोर येईल..!सर्व तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाची कसून चौकशी झाली तर भूखंड लाटणाऱ्यांचा मोठा घोटाळा समोर येईल. यामध्ये भूखंड माफीयांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील पितळ उघडे पडेल त्यामुळे अभिलेख कक्ष तपासण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केली आहे.
खासरा पत्रकाविनाच जमिनीची खरेदी-विक्री
By admin | Updated: December 14, 2015 23:57 IST