पारगाव : भरधाव वेगातील ट्रकने बसला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांसह ट्रकचालक जखमी झाला़ यातील एका युवतीच्या डोक्याला गंभीर जखम झाली़ दरम्यान, अपघात प्रसंगी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रुंदीकरणातील नवीन रस्त्यावर नेल्याने मोठी दुर्घटना टळली़ ही घटना शनिवारी दुपारी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथून भूमकडे निघालेली बस (क्ऱएम़एच़१४-बी़टी़२२६२) ही शनिवारी दुपारी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ आली होती़ त्यावेळी उमरग्याहून जळगावकडे सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने (क्ऱएम़एच़२५- पी़६६४७) बसला समोरून जोराची धडक दिली़ याचवेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्ता रुंदीकरणाच्या नवीन रस्त्यावर बस नेली़ बसच्या उजव्या बाजूला ट्रकने धडक दिल्याने बसमधील शुभांगी तानाजी उकिरडे (वय-१७ रा़ दिंडोरी ता़भूम), मिना शाम वाघमारे (वय-२० रा़ ईट़ ता़भूम), हर्षद मुकेश केकान (वय-०३ रा़ खंडाळा ता़जि़बीड) तीन प्रवासी जखमी झाले़ तर ट्रकचालक ज्ञानेश्वर हा ही या अपघातात जखमी झाला असून, त्याच्या हाताला जबर मार लागला आहे़ जखमीतील शुभांगी उकिरडे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे़ त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना वाशी येथील रुग्णालयाकडे पाठविण्यात आले़ तर इतर जखमींवर पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले़ अपघातानंतर पारगाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यास मदत केली़
बस-ट्रकची समोरासमोर धडक
By admin | Updated: April 8, 2017 23:20 IST