औरंगाबाद : एसटी मंडळाकडून वेळोवेळी चालकांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यात येते; परंतु शुक्रवारी एका चालकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे एसटीचालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याची बाबही समोर आली. सिल्लोड बसस्थानकामधून सिल्लोड-सारोळा बस (क्र. एमएच-२० डी-५५६४) घेऊन सारोळ्याकडे जात असताना मंगरूळ फाट्याजवळ चालकाला छातीत त्रास जाणवला. त्यानंतर बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मे महिन्यामध्ये एसटीच्या उत्पन्नात बरीच भर पडते. प्रवाशांना एसटीतर्फे चांगली सेवा मिळणे आवश्यक असते. यामुळे उन्हाळी हंगामात महामंडळ चालक, वाहकांच्या सुट्यांवर निर्बंध आणते. प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी चालक, वाहकांना या हंगामात देण्यात येणार्या सुट्यांमध्ये कपात करण्यात आली. ३१ मेपर्यंत चालक, वाहकांच्या सुट्या गोठविण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली आहे. अनेक वेळा चालक आठ तासांच्या ड्यूटीऐवजी १२ ते १४ तास ड्यूटी करतात. त्यातून चालकांची मानसिक स्थिती, आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. गर्दीच्या हंगामात चालक, वाहकांना देण्यात येणार्या जादा ड्यूटीमुळे कर्मचार्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामंडळाकडून चालकांच्या आरोग्यासाठी आणि एसटी गाड्यांच्या सुरक्षेसाठी चालकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चालकांच्या आरोग्याबाबत एसटी महामंडळ कितपत काळजी घेते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य तपासणी विभागातील चालकांची नियमितपणे तज्ज्ञांकडून आरोग्य, नेत्र तपासणी करण्यात येते. विविध एनजीओंमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. चालकांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.
बसचालकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: May 11, 2014 00:08 IST