पूर्णा (परभणी) : माहेरी असलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेलेल्या शेख मस्तान शेख चाँद पाशा या जावयाला सासरच्या मंडळींनी रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना पूर्णा येथे घडली. आधी परभणीत घरी त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून कशीबशी सुटका करत पूर्णेला गेलेल्या जावयाला तिथे गाठूृन पुन्हा रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आले. या घटनेने जिल्हा हादरला असून सासरच्या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पूर्णा येथील रहिवासी शेख मस्तान २३ मे रोजी परभणी येथील मुस्ताक मंजील येथे आपल्या सासुरवाडीत पत्नीस आणण्यासाठी गेला होता. मात्र ती तयार नसल्याने थोडा वाद झाला. सासू हसीना, मेहुणा इमरान व त्याचा मित्र अजीम याने शेख मस्तानला शिवीगाळ करुन थापड-बुक्क्याने मारहाण केली तसेच त्याच्या अंगावर रॉकेल ओतले. या झटापटीतून सुटका करत मस्तानने रेल्वेने पूर्णा गाठले. परंतु त्याचा पाठलाग करीत मेहुणा इमरान हा पूर्णा येथे पोहचला आणि पुन्हा त्याच्या अंगावर रॉकेल ओतून काडीने पेटवून दिले. यात मस्तान गंभीर भाजला. त्याला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रारंभी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. परंतु नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती. (वार्ताहर)
सासुरवाडीतून कशीबशी सुटका केल्यानंतर गावी जाऊन पेटविले
पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने निर्माण झालेल्या किरकोळ वादातून सासरच्या तिघांनी जावयाला रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यातून कशीबशी सुटका करत जावयाने मूळ गाव पूर्णा गाठले. मात्र त्याच्याच मागावर असलेल्या मेव्हण्याने तिथेही जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.