जालना : लक्ष्मीनारायणपुरा येथील आपर्टमेंटमध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटमधील तसेच परिसरातील रखडलेली कामे साठ दिवसांच्या आत पूर्ण करून देण्यासोबतच तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी दहा हजार रूपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहकमंचने दिले आहेत. जालना येथील रहिवासी संजय गायकवाड व मालती संजय गायकवाड यांनी जानेवारी २०१५ मध्ये लक्ष्मीनारायणपुरा भागातील एका आपर्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅट खरेदी करताना गायकवाड यांना सर्व सोयी सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र बिल्डर पैशांअभावी काम संथगतीने करीत असून, संपूर्ण पैसे दिल्यास काम तात्काळ करतो व फ्लॅटचे खरेदीखत तुमच्या हक्कात करून देतो असे सांगून अपूर्ण बांधकाम झालेला व कोणत्याही सोयीसुविधा नसलेला फ्लॅट गायकवाड यांना विक्री केला. फ्लॅटचे खरेदीखत झाल्यानंतर गायकवाड दाम्पत्याने वारंवार विनंती करून आपर्टमेंटचे उर्वरित काम करण्याबाबत विचारणा केली. परंतु बिल्डरने कराराप्रमाणे काम न करता थातूरमातूर वेळकाढू उत्तरे देऊन दुर्लक्ष केले. टाईल्स, व्हेंटीलेशन जाळी, लिफ्ट, पाण्याची टाकी, एक बोअरवेल, संरक्षक भिंत आदी पुरविण्याचे आश्वास फ्लॅट खरेदी करताना दिले होते. प्रत्यक्षात १८ महिने विनंती करूनही या सुविधा दिल्या नाहीत. तक्रारदार गायकवाड यांनी अॅड. एस.बी.सिंधनकर यांच्या मार्फत ग्राहकमंचात धाव घेऊन तक्रार दिली. ग्राहक मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून फ्लॅट खरेदीदाराला ज्या सुविधा विक्री वेळी देण्यात आल्या होत्या त्या ६० दिवसांच्या आत पुरविण्याचे आदेश दिले. तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी दहा हजार तसेच तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये देण्याचे आदेश सिद्धी कन्सट्रक्शनचे स्रेहलचंद्र नंदकिशोर सलगरकर यांना दिले. (प्रतिनिधी)
बिल्डरने बिल्डींगची कामे करून देण्याचे ग्राहक मंचचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:53 IST