आष्टी : आष्टी-सेलू मार्गावरील सेलगाव जवळील कसुरा नदीवरील पूल पहिल्याच पुराने खचला आहे. एका बाजूची भिंत कोसळल्याने पूल धोकादायक बनला असून, वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्षभरापूर्वी कसुरा नदीवर १५ लाख रूपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत येथे पूल उभारण्यात आला होता. मात्र, पुलाचे काम संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट केल्याने हा पूल शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने खचला आहे. या पुलाला भेगा पडल्या असून, या माार्गावरील वाहतूक धोक्यात आली आहे. पुलाची एक बाजू पूर्णपणे कोसळली आहे. सदरील कंत्राटदाराने पूल ढासळल्याचे समजताच तात्काळ पुलाची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. त्या कामास सेलगाव येथील ग्रामस्थांनी या कामास विरोध करत काम बंद पाडले. यावेळी सार्वजनिक विभागाचे उपअभियंता एल.डी.दवेकर व कनिष्ठ अभियंता बी.डी.मस्के यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आले. या ठिकाणी नवीन दर्जेदार पूल बांधण्यात यावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. उपअभियंता एल.डी.देवकर यांनी लेखी आश्वासन दिल्याने तात्पुरती डागडुजी करण्याचे काम पुन्हा सुरू झाले. दरम्यान, पुलाचे काम बोगस करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)
पहिल्याच पुराच्या पाण्याने पूल खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 23:58 IST