औरंगाबाद : गोदावरी नदीवरील आपेगावजवळील पूल अचानक खचला असून, पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याबद्दल संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची व संबंधित उपअभियंत्याला निलंबित करण्याची मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात भीमशक्तीचे विजयराज अंभोरे, सनी भुरेवाल, राकेश पाटील, श्रीकांत वाघमारे, सुनील बनकर, राजेश कोल्हे, प्रशांत बिऱ्हाडे, अभिजित जाधव, शुभम नरवडे, प्रज्ञानंद नरवडे, उज्ज्वल दामले व सुमेध चौधरी आदींनी निवेदन सादर केले आहे.निवेदनात म्हटले आहे की, सत्तर वर्षे टिकण्याऐवजी बारा वर्षांतच हा पूल कोसळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पैठण उपविभागांतर्गत १९९८-९९ मध्ये गोदावरी नदीवर आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणप्रिंप्री यांना जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत चार कोटी रुपये होती. २००१-०२ मध्ये पूल उभारणीचे काम पूर्णही झाले आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अवघ्या बारा वर्षांत हा पूल खचला आहे. आपेगाव पुलाच्या एकूण २९० मीटर असलेल्या ११० खांबांपैकी ४३ खांब निकृष्ट दर्जाचे असल्याने ते वाकले आहेत. तसेच गोदावरीच्या २० फूट नदीपात्रात खड्डे पडले आहेत. बांधकाम खात्याच्या नियमानुसार वर्षातून दोनदा पुलाची पाहणी करावी लागते; परंतु बारा वर्षांतून एकदाही पुलाची पाहणी करण्यात आली नाही. वाळूमाफियांनी पुलाच्या बाजूला खड्डे करेपर्यंत यंत्रणा काय करीत होती? हा पूल खचल्याची जबाबदारी कोणाची? संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई करण्यात आली पाहिजे व त्या एजन्सीला काळ्या यादीत टाकले पाहिजे, यावर भीमशक्ती संघटनेने भर दिला आहे.
आपेगावजवळील पूल अचानक खचला?
By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST