लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : १० दिवसांच्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता होत असून, श्रींच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे़ पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात कडक बंदोबस्त ठेवला असून, महानगरपालिकेने परभणी शहरातील गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी जलशुद्धीकरण केंद्रात मोठा हौद तयार केला आहे़२५ आॅगस्टपासून जिल्हाभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे़ विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींच्या सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे़ १० दिवस गणेशोत्सवाच्यानिमित्ताने जिल्हाभरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ या गणेशोत्सवाची सांगता श्रींच्या विसर्जनाने होणार आहे़ मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींचे विसर्जन केले जाणार आहे़ विसर्जनाच्या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणुका काढल्या जातात़ ढोल, झांज पथक, लेझीम पथम या मिरवणुकांमध्ये सहभागी होते़ विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे़ विसर्जन मार्गावर पाँर्इंट तयार केले असून, प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालतात़ ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी केली आहे़ महापालिकेने देखील विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष तयारी केली आहे़ कॉलनीनिहाय घरातील श्रींच्या विसर्जनासाठी प्रभाग समितींंतर्गत नियोजन करण्यात आले आहे़ प्रभाग समिती अ अंतर्गत विसावा कॉर्नर, गणपती चौक, बाल विद्यामंदिर शाळा या ठिकाणी श्रींच्या मूर्ती जमा केल्या जाणार आहेत़ प्रभाग समिती ब अंतर्गत दर्गा रोड, कृत्रिम रेशीम केंद्र कार्यालय येथे मूर्ती जमा केल्या जाणार असून, प्रभाग समिती क अंतर्गत काळी कमान समोर, खंडोबा बाजाराजवळील विहिरीजवळ, आशीर्वादनगरातील दुर्गा माता मंदिर, मनपाची जुनी इमारत या ठिकाणी मूर्ती जमा केल्या जणार आहेत़
बाप्पांच्या निरोपाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:42 IST