माधव शिंदे मसलगादुष्काळानंतर अतिवृष्टीने पिके वाहून गेली. परिस्थितीशी दोन हात करीत सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे लाखोंचा फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील दोन शेतकऱ्यांनी चार एकर टरबुजांची लागवड केली. वेल वाढले; पण फळेच लगडली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील शेतकरी चाँदसाब याकुबसाब सय्यद व जिलानी याकुबसाब सय्यद या दोन शेतकऱ्यांनी गट नं. ७९ मध्ये प्रत्येकी दोन एकरप्रमाणे चार एकर टरबुजांची लागवड केली. २५ सप्टेंबर २०१६ रोजी अत्याधुनिक पद्धतीने टरबूज पिकाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे मशागत करण्यात आली. पीकही जोमात आले. फुले बहरली. ९० दिवसांनंतर फळधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले. बियाणांबाबत चौकशी केली. कृषी विभागाकडे तक्रार केली. आता काय करावे, हे दोघांनाही सुचत नव्हते. दरम्यान, दोघा भावांनी रितसर तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतात आले. त्यांनी टरबूज लागवडीची पद्धत, बियाणे आदींबाबतची माहिती जाणून घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. मोरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ.एम.व्ही. धुप्पे, तालुका कृषी अधिकारी पी.जे. पाटील, मंडळ अधिकारी संतोष पाटील, कृषी सहायक कळसे आदींनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. मशागतीसाठी लाखो रुपये खर्च करून पदरी काहीच पडणार नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळानंतर सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला असला, तरी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी सरपंच सुरेंद्र धुमाळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व तपासणी पथकाकडे केली आहे.
बोगस बियाणांचा फटका !
By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST