औरंगाबाद : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून चार गुन्हेगारांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला आणि नंतर प्रेत हिलाल कॉलनी परिसरात खाम नदीत नेऊन पुरल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मजाज खान दिलावर खान (३५, रा. बिस्मिला कॉलनी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून करणाऱ्या शेख अमजद शेख असद (२५, रा. कटकटगेट), शेख मजीद शेख अली (२४, रा. खडकेश्वर), शेख शोहेब ऊर्फ गुड्डू शेख सलीम (२१, रा. काजीवाडा, भडकलगेट) व शेख जावेद ऊर्फ बबल्या (२१, रा. आसेफिया कॉलनी), अशी आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अमजदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर इतरांविरुद्ध चोरीचे गुन्हे आहेत. मयत मजाज खान हा रिक्षा चालवायचा. तो आपल्या टीप पोलिसांना देतो, असा या आरोपींना संशय होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून आरोपी त्याच्यावर राग धरून होते. मजाज रात्री घरी परतला नाही. घरच्यांनी शोध घेतला; परंतु तो सापडेना. शुक्रवारी मजाजला बबल्या व त्याचे साथीदार बळजबरीने घेऊन गेल्याचे रिक्षाचालक मज्जूने सांगितले. लगेच मजाजच्या भावाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले आणि बबल्या व त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली. त्यावरून बेगमपुरा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. अखेर एकापाठोपाठ चारही आरोपींना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. ‘खाक्या’ दाखवून मजाज कोठे आहे, अशी विचारपूस सुरू केल्यानंतर अखेर आरोपींनी तोंड उघडले. मजाज आपल्या टीप पोलिसांना देत होता. त्यामुळे आम्ही मारहाण करून त्याचा खून केला. नंतर प्रेत हिलाल कॉलनीजवळ खाम नदीत खड्डा खोदून पुरले, अशी कबुली आज सकाळी आरोपींनी दिली.
खून करून प्रेत नदीत पुरले
By admin | Updated: October 12, 2014 00:30 IST