जालना : जुना जालना भागातील लक्ष्मीनारायणपुरा येथील संतोष अशोक आगळे (२५) या तरूणाच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.लक्ष्मीनारायण पुरा येथील संतोष आगळे यांची मस्तगड भागात हेअर सलूनची दुकान आहे. रविवारी सायंकाळी राजू रामचंद्र फदेराम सोबत ते गेला होते. संतोष परत न आल्याने दुकानातील कारागिराने त्यांचा भाऊ राजेंद्र आगळे यांना मोबाईल करून दुकानात बोलावून घेतले. दरम्यान रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीतील पो. कॉ. राठोड यांनी राजेंद्र आगळे यांना मोबाईलवर संतोषला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. ती माहिती मिळताच राजेंद्र व घरची अन्य मंडळी तातडीने रुग्णालयात गेले. दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने संतोषला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णवाहिकेत राजेंद्र व त्यांचे नातेवाईक होते. जखमी अवस्थेत संतोषने राजू फदेराम याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आपल्याला बळजबरीने दारू पाजून रेल्वे स्टेशन रोडवरील जि.प. हायस्कूलच्या प्रागंणात फदेराम व अन्य अनोळखी इसमांनी काठीने व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे राजेंद्र आगळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून १२ नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात राजू रामचंद्र फदेराम व अन्य अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष आगळे यास जबर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास जखमी अवस्थेत राजू फदेराम याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून मंठा चौफुलीजवळ अपघातात जखमी झाल्याचा बनाव केला होता. तसेच आपले नाव राजू खरात असल्याचे सांगून फरार झाला होता. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासात मंठा चौफुलीजवळ अपघातच झाला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. तसेच घटना घडल्यापासून फदेराम बेपत्ता झाला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय होता. गुरूवारी याप्रकरणी राजेंद्र आगळे यांनी तक्रार दिल्याने कदीम जालना पोलिसांनी फदेराम विरूद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याप्रकरणाचा अधिक तपास सपोनि बुंदेले हे करीत आहे.याप्रकरणी गुरूवारी प्रथम सदर बाजार पोलिस ठाण्यात शून्यने खुनाचा दाखल करून तो कदीम जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि बुंदेले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तपासाची सूत्रे हलवून आरोपी फदेराम यास अटक केली. अटक केल्यानंतर त्याला चक्कर आल्याने पोलिसांनी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यास शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सपोनि गोकुलसिंग बुंदेले यांनी दिली.
‘त्या’ तरूणाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून
By admin | Updated: November 14, 2015 00:49 IST