व्ही.एस. कुलकर्णी , उदगीरआंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय अन् अनाथांची माय अशा शब्दात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला काकू डोळे यांना अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थितांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली़ रविवारी पहाटे उदगीरच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला काकू डोळे यांचे देहावसान झाले़ त्यांच्या निधनानंतर समाजातील विविध घटकांतून शोकसंदेश येणास सुरुवात झाली़ सामाजिक कार्याचा डॉ़ ना़ य़ डोळे यांचा वारसा निर्मला काकूंनी चालविला होता. काकूंच्या जाण्यानंतर त्यांच्या कार्याचा व आठवणींचा कल्लोळ दाटला होता़ यामध्ये स्त्रिया व त्यांचे हक्क आणि अधिकार यांचे होणारे शोषण या संदर्भात डोळे काकूंनी आंदोलने केली, मोर्चे काढले़ त्यातून महिलांना न्याय मिळवून दिला़ त्यांचे वागणे, बोलणे सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे होते. समाजकारणातील झाशीची राणी म्हणूनच त्यांची ओळख होती़राजकारण समाज परिवर्तनासाठीच असते़ याचा एक मानदंडच त्यांनी घालून दिला़ जगावे कशासाठी आणि कसे याची पायवाट त्यांनी घालून दिली़ जातीभेदांच्या भिंती त्यांनी जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केल्या़ समतेची व ममतेची ज्योत प्रज्वलित केली़ गरीब विद्यार्थी व कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे़ आदरातिथ्य हा त्यांचा स्वभाविक गुणधर्म होता़ घरी आलेला अतिथी विण्मुख जाणार नाही, याची त्यांनी सातत्याने काळजी घेतली़ स्वत:च्या घासातला घास काढून त्यांनी अनेकांची भूक भागविली़ उदगीर व बाहेरील समाजातील अनेक कार्यकर्ते डोळे सरांच्या घरात व परिवारात घडले़ यामध्ये काकूंचा मोठा हातभार होता़ नगरसेविका असताना त्यांनी सर्व जातीधर्मातील माणसांना सोबत घेवून कार्य केले़ नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले़ साने गुरुजींचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी उदगीर येथे १९७२ साली नवसमाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन करून गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली.डोळे काकूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुरुंगवासही भोगला़ महिला दक्षता समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अनेक वर्षे राहिले़ राष्ट्र सेवादल, समाजवादी पक्ष, छात्रभारती आणि जनता पार्टी अशा अनेकविध समाजवादी विचारसरणीच्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून कार्य केले़ ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले़
आंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय अन् अनाथांची माय़़़
By admin | Updated: September 5, 2016 00:50 IST