गंगाराम आढाव , जालनानगर पालिका निवडणुकीसाठी मतदार नोंदणीकरिता तहसील प्रशासनाकडून बीएलओंची नेमणूक केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक बीएलओ नेमून दिलेल्या बुथवर फिरकतच नसल्याचे शनिवारी आणि रविवारी लोकमतने केलेल्या स्टिंगमधून उघडकीस आले आहे. जालना नगर पालिका निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. यासाठी नुकतीच प्रभाग रचना नव्याने जाहीर झालेली आहे. त्यानंतर नवीन प्रभाग रचनेनुसार मतदान याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे आदी कामे निवडणूक विभाग व नगर पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले. तसेच नवीन मतदारांची नावे यादीत समावेश करणे, नावात दुरूस्ती, स्थलांतरीत झाले असतील तर त्यांचे नाव कमी करणे, मयतांचे नाव यादीतून कमी करणे, मतदान नोंदणीसाठी अर्ज भरून घेणे, यासाठी तहसीलच्या वतीने शहर हद्दीतील बुथवर १९६ बीएलओ (बूथ लेवल आॅफिसर) ची नेमणूक करण्यात आली. तर त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी १९ पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत. या बीएलओंना दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन तास तसेच शनिवार आणि रविवार पूर्ण दिवसभर नेमलेल्या बुथवर थांबवून मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत. यासंदर्भात गत आठवड्यात सर्व बीएलओंची बैठक घेवून त्यांना प्रामाणिकपणे कामे करण्याच्या सूचना देऊन कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. याबाबत लोकमतने किती बीएलओ शनिवार आणि रविवार पूर्ण वेळ बुथवर थांबतात याबाबत प्रत्येक बुथची पाहणी केली असता केवळ एकाच बुथवर बीएलओ आढळून आला. त्या बुथवर तीन बीएलओची नेमणूक होती. पैकी एकच हजर होता. उर्वरित सर्वच मतदान केंद्रावरील बुथवर एकही बीएलओ किंवा पर्यवेक्षक आढळून आलेले नाहीत.
मतदान केंद्रावर बीएलओंची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 01:12 IST