उस्मानाबाद : सिंचनाची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केलेल्या गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यांना यापुढे शासकीय कामे द्यायची नाहीत, असे निर्देश असतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवित त्याच गुत्तेदारांना पुन्हा शासकीय कामे देण्याचा प्रताप जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आला आहे. २०१३ मधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सिंचनाची १५४ कामे हाती घेण्यात आली होती. परंतु, दिलेल्या मुदतीत यापैकी अवघी ५५ कामे या कंत्राटदारांनी पूर्ण केली होती. या प्रकारामुळे संबंधित नऊ ठेकेदारांची निविदा रद्द करीत त्यांची अनामत रक्कम जप्त करुन या गुत्तेदारांना काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला होता. मात्र, याबाबत पुढे काहीही कार्यवाही झालेली नाही. बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता सदर प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र, तो वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले. सदर ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाका, असे सांगणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी पुन्हा वरील प्रस्तावात नावे असलेल्या तीन ठेकेदारांना कामे बहाल केली आहेत. यामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन, एस. जी. खुजावर, शिवशक्ती कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही त्याकडे कानाडोळा करून या तीन ठेकेदारांवर पाटबंधारे विभाग कशासाठी मेहेरनजर दाखवित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही आहेत कामे वैष्णवी कन्स्ट्रक्शनने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा सिमेंट नाला बांध क्रमांक १,२,३ व पिंपळा (खु) १,२ कामासाठी निविदा तसेच मसला (खु) ३,४,५ सांगवी मार्डी येथील ३,४ कामांसाठी जलयुक्त शिवार अभियान सन २०१५-१६ अंतर्गत साखळी सिमेंट नाला बांधकामाच्या निवेदत सहभाग नोंदविला आहे. एस.जी.खुजेवार गुत्तेदारने उमरगा तालुक्यातील दापका व लोहारा तालुक्यातील काष्टी, भोसगा कामासांठी निविदा, तर शिवशक्ती कस्ट्रक्शन वाशी तालुक्यातील नांदगाव पार्डी कामांसाठी निविदा भरण्यात आलेल्या आहेत.
काळ्या यादीत प्रस्तावित गुत्तेदारांना पुन्हा कामे
By admin | Updated: April 24, 2015 00:37 IST