जालना : गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसह एकेकाळचे मित्र असणाऱ्या शिवसेनेसपेक्षाही मोठ्या प्रमाणात मतदान पदारात पाडून जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास चकीत केले आहे.या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत भाजपाचा मोठा सफाया झाला. एकही जागा मिळाली नाही. या उलट या निवडणुकीत भाजपाने भोकरदन व परतूर हे मतदार संघ खेचून आणले. व बदनापूरची जागाही पटकाविली. विशेष म्हणजे घनसावंगी दुसरा व जालन्यात तिसरा क्रमांकाची मते घेतली. जिल्ह्यातील भाजपाचे हे यश चकीत करणारे ठरले आहे. कारण गेल्या निवडणुका व यावेळच्या निवडणुकीतील मतदानासह टक्केवारीचा पडताळणी केली तर सहजपणे हे यश नजरेत भरण्यासारखे आहे. गेल्या निवडणुकीत परतूर मधून बबनराव लोणीकर हे पराभूत झाले होते. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यावेळी लोणीकर यांना ३१ हजार २०० मते मिळाली. तर या निवडणुकीत लोणीकर यांनी ४६ हजार ९३७ मते मिळविली आहेत. म्हणजेच भाजपाने सरासरी १५ हजार मते जादा मिळविली आहेत.भोकरदनमधूनही गेल्या निवडणुकीत निर्मलाबाई दानवे यांनी ६५ हजार ८४१ मते मिळविली होती. या निवडणुकीत तेथून त्यांचे सुपूत्र संतोष दानवे यांनी ६९ हजार ५९७ एवढी मते घेतली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपात युती होती. या निवडणुकीत युती संपुष्टात आली. तरीसुद्धा भाजपाने समविचारी पक्षांच्या मतांमधून मत विभागणीचा एवढा मोठा धोका असताना सुद्धा दोन्ही जागी विजश्री खेचून आणली. व लक्षणीय मते सुद्धा घेतली. बदनापूरमधून भाजपाचे यश लक्षवेधी व देदीप्यमान आहे. कारण महायुती संपुष्टात आल्यानंतर भाजपाने उमेदवाराचा शोध सुरु केला. औरंगाबाद येथील नारायण कुचे यांना उमेदवारी बहाल केली. अवघ्या सतरा दिवसांच्या प्रचार युद्धात भाजपाने प्रभाव क्षेत्रातील भक्कम साथीच्या जोरावरच यश तर पटकाविलेच परंतु शिवसेनेसह राष्ट्रवादीस तब्बल सरासरी २३ हजार मताधिक्याने लोळविले. तेथून भाजपाने ७३ हजार ५६० एवढी मते मिळविली आहेत. घनसावंगीतून सुद्धा भाजपाने यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. तेथून माजी आ. विलास खरात यांनी ५४ हजार ५५४ मते मिळविली आहेत. ही सुद्धा मते लक्षणीय आहेत. जालन्यातूनही भाजपाने पहिल्यांदाच निवडणूक लढविली. माजी आ. अरविंद चव्हाण यांनी तब्बल ३७ हजार ५९१ मते मिळविली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. परंतु भाजपाची मते लक्षणीय ठरली आहेत. या जिल्ह्यात भाजपाने एकूणच २ लाख ८२ हजार ५६ मते मिळविली. भाजपाचे हे यश नेत्रदीपक आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने २ लाख २३ हजार त्या पाठोपाठ शिवसेनेने १ लाख ७६ हजार ८५१ तर काँग्रेसने १ लाख ८ हजार ४१४ मते पटकाविली. मनसेने पाच मतदार संघात ५६ हजार २२६ मते मिळविली आहेत. (प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे सव्वा लाखांवर नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली.
भाजपच्या मतांचा टक्का वाढला
By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST