वसमत : न. प. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपाचे भगवान कुदाळे यांची अध्यक्षपदी तर शिवसेनेच्या शकुंतला ईपकलवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शिवसेना- भाजपातील कराराप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात एक वर्षासाठी भाजपाकडे अध्यक्षपद झाले आहे.वसमत नगरपालिका सभागृहात अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या पाच उमेदवारांपैैकी तिघांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपाचे भगवान कुदाळे तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष शशीकुमार कुल्थे हे दोघेच मैदानात राहिले. यावेळी हात उंचावून झालेल्या मतदानात कुदाळे यांना १४ तर कुल्थे यांना १२ मते पडली. दोन मतांनी कुदाळे विजयी झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी अनुराधा ठालकरी यांनी केली.उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शकुंतला ईपकलवार यांना १४ तर काँग्रेसच्या गीताबाई गवळे यांना १२ मते पडली.सभागृहात सेना-भाजपा युतीकडे १४ तर काँग्रेस- राष्ट्रवादीकडे १२ संख्याबळ आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सेना-भाजपाकडे पुन्हा न. प. ची सत्ता आली. सभागृहात सर्व २६ सदस्य हजर राहिले. पीठासन अधिकारी म्हणून अनुराधा ढालकरी यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल व नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी सहकार्य केले.निवड घोषित झाल्यानंतर विजयी पदाधिकाऱ्यांचा माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, तानाजी मुटकुळे, शिवदास बोड्डेवार, मावळत्या नगराध्यक्ष सुषमा बोड्डेवार, नवीनकुमार चौकडा, माजी नगराध्यक्षा कुमूदिनी बडवणे आदींनी सत्कार केला. सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढून जल्लोष केला. न. प. मध्ये युतीचे बहुमत आहे. तरीही राकाँचे माजी नगराध्यक्ष शशिकुमार कुल्थे यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत चमत्कार होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने चुरस निर्माण झाली होती. (वार्ताहर)सर्वांना सोबत घेवून विकासकामे करणार- भगवान कुदाळेयेणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांना सोबत घेवून शहराचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील. शहरातील लाईट, पाणी व शहर स्वच्छता यास प्राधान्य देवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प पुर्ण करणार असल्याचे नगराध्यक्ष भगवान कुदाळे यांनी सांगितले.
वसमतच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे कुदाळे
By admin | Updated: July 16, 2014 00:50 IST