ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २९ - महाराष्ट्र राज्य तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच केला असून मराठवाड्याला डावलून विदर्भाला झुकतं माप दिलं जात आहे असं शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
औरंगाबादमध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं संमत झालेलं कार्यालय नागपूरला हलवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. आयआयटी असो, आयआयएम पासून अनेक गोष्टी विदर्भाला देण्यात येत आहेत आणि मराठवाड्यावर अन्याय होत आहे असा थेट आरोप खैरे यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसच्या काळात निधी मिळत होता, परंतु आता आमचंच सरकार असतानाही आम्हाला निधी मिळत नसल्याची टीका खैरे यांनी केली आहे.
दरम्यान, अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जे औरंगाबादला मंजूर झालं आहे ते नागपूरला हलवण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगत आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असं ते म्हणाले. खैरे यांच्या शंका आम्ही दूर करू असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मात्र, खैरे यांच्या थेट आरोपांमधून भाजपा व शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याचं आणि युती सरकारात आलवेल नसल्याचं दिसत आहे.