बीड : जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध सुरु असलेला अविश्वासाचा ‘गेम’ राष्ट्रवादीच्या नाराजांकरवीच व्हावा यासाठी भाजपाकडून ‘प्लॅन’ सुरु आहेत. त्यासाठी नाराजांना गळ लावण्याचे काम भाजपामार्फत सुुरु आहे. राष्ट्रवादी कु ठली चाल खेळते यावरच भाजपाची खेळी अवलंबून असणार आहे. त्यामुळे जि.प. चे राजकारण ढवळून निघत आहे.विजयसिंह पंडित यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. मात्र, पंडित यांना खिंडीत पकडण्यासाठी अविश्वासाच्या ठिणगीला हवा देण्याचे काम भाजपाकडून शिस्तबद्ध पद्धतीने सुरु आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांतील नाराजांना ‘स्वाभिमाना’ची आठवण करुन देण्याबरोबरच वित्त आयोग, झेडपीआरमध्ये झालेल्या अन्यायाची जाणिवही करुन दिली जात आहे. राष्ट्रवादीतील नाराजांनी अविश्वास ठराव आणला तर भाजपाचे महत्त्व आपोआपच वाढते. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने जि.प. चा कारभार सांभाळताना भाजपाला अधिक पोषक वातावरण आहे. त्यामुळे भाजपाने राकाँतील काही पदाधिकाऱ्यांना गळ लावला आहे. त्यासाठी गुप्त बैठकांचे सत्र रंगल्याच्या चर्चाही झडत आहेत. विजयसिंहांवर अविश्वास ठराव आणून सत्तांतर झाले तर पुन्हा एकदा ‘किंगपोस्ट’ मिळू शकते, असा ‘विश्वास’ भाजपातील काही पदाधिकाऱ्यांना आहे. भाजपाच्या श्रेष्ठींनी राष्ट्रवादीने अविश्वास ठराव आणला तर पंडित यांची गच्छंती करण्याची संधी सोडायची नाही, असे स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. (प्रतिनिधी)जि.प. मध्ये काँग्रेसच्या एकमेव सदस्या आशा संजय दौंड यांनी आघाडीधर्म पाळून अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीला मतदान केले होते. बदल्यात त्यांना उपाध्यक्षपद दिले. मात्र, ऐनवळी त्यांच्याकडील अर्थ व बांधकाम ही खाती काढून घेत राष्ट्रवादीने त्यांची अडचण केली. केवळ पशुसंवर्धन व कृषी खात्यावर दौंड यांना समाधान मानावे लागले होते. अध्यक्ष विजयसिंह हे अविश्वास ठरावाच्या चक्रव्यूहात अडकलेले असताना काँग्रेस त्यांच्या मदतीला धावून येईल की नाही? याबाबत शंका आहे. दौंड यांना निमंत्रण देऊन भाजपाने काँग्रेसच्या ‘हात’भारावर उभ्या असलेला राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्याची रणनीतीही आखलेली आहे.
अविश्वासाच्या ‘घडी’ला भाजपा देणार चावी !
By admin | Updated: April 4, 2015 00:34 IST