महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील ओम गार्डन येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत हाेते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, माजीमंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, माजीमंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. शामसुंदर शिंदे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, अनुसया खेडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भाजपातील दिग्गज नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत आल्यामुळे आता भाजपला सुरुंग लागला आहे. महाविकास आघाडीचे सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येत असतील, निर्णय मागेपुढे होत असतील तरी राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीश्वरांच्या पुढे झुकला नाही. तो पुढे झुकणार नाही असेही पवारांनी ठणकावून सांगितले. राज्याच्या हक्काचा २८ हजार ७०० कोटी रुपये जीएसटी केंद्राकडे थकला आहे. हक्काचे पैसे केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टी, चक्रीवादळात मागच्या सरकारपेक्षा आताच्या महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही पवार यांनी केले.
चौकट,
बोलबच्चन बोलताहेत
महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगत सार्वजिनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना राज्य शासन बोलबच्चन असल्याचे म्हटले, मात्र खरे तर हा शब्द भाजपलाच लागू पडतो. १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कोणी दिले होते, असा सवालही त्यांनी केला. पहिल्यांदाच पंजा, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्यामुळे ही निवडणूक अनोखी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल हे ऐकून राज्यातील लोकांच्या कानठळ्या बसल्या आहेत. ज्यांनी मी पुन्हा कुठे येणार याची माहिती नव्हते. ते पुन्हा राज्यात कसे येणार होते, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.