लातूर : मागील ६० वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. आतापर्यंत असले निष्क्रिय सरकार मी पाहिले नाही. आमच्या पक्षाची सत्ता असतानाही दुष्काळ पडला होता. दुष्काळ निवारणासाठी त्यावेळी विविध उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सध्याच्या सरकारला दुष्काळाची दाहकता समजत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केली.जिल्हा परिषदेच्या वतीने समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अमित देशमुख होते. मंचावर आमदार त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, माजी जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कृषी सभापती कल्याण पाटील, बांधकाम सभापती सपना घुगे, समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, अॅड. व्यंकट बेद्रे, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, सीईओ दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, विद्यार्थी दशेपासून मी कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री म्हणूनही नेतृत्व केले आहे. काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांचे हिताचे अनेक निर्णय घेतले. मात्र सध्याचे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न ज्ञात नाहीत. पीककर्जाचे पुनर्गठण या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने लावली आहे. प्रास्ताविक जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
भाजपा-सेनेचे सरकार निष्क्रिय
By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST