अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे प्रणित पॅनलमधील उमेदवारांपेक्षा नेतृत्वाची संख्या वाढल्याने मोठी गटबाजी निर्माण झाली. अंतर्गत बंडाळी, प्रचार यंत्रणेत नसलेला सुसंवाद, क्रॉस व्होटींग यामुळे भाजपला पराभव पहावा लागला. दुसरीकडे, काँगे्रस-राकाँची व्यूहरचना व नेत्यातील एकीचे बळ विजयासाठी कामी आले.पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे यांच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली. पालकमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी जोर लावल्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. पंकजा मुंडे यांनी पॅनल भक्कम करण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, रमेशराव आडसकर, अॅड. आनंदराव चव्हाण, अशोकराव देशमुख, दत्तात्रय पाटील, राजाभाऊ औताडे अशा तगड्या नेत्यांकडे धुरा सोपविली होती तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी हातमिळवणी करीत मजबूत मोट बांधली. नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, संजय दौंड, राजेसाहेब देशमुख, हनुमंत मोरे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून किल्ला लढवला.या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात मोदी-मुंदडा पुन्हा आमने सामने आले. अंबाजोगाई शहरांवर मोदींचे असणारे वर्चस्व याचा मोठा फायदा पंकजा मुंडे यांच्या पॅनलला होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली. नंदकिशोर मुंदडा यांचे समर्थक नूर पटेल व राजकिशोर मोदी यांचे समर्थक प्रकाश सोळंकी या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. वर्षभरापूर्वी भाजपात प्रवेश केलेले सुनील लोमटे यांच्या विजयामुळे भाजपला नवे नेतृत्व मिळाले आहे तर अक्षय मुंदडा यांचे नेतृत्वही या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले. कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास व गटबाजी याचा फटका भाजपला सहन करावा लागला.परळी व केज मतदार संघ अशी विभागणी अंबाजोगाई तालुक्याची असल्याने आगामी काळातली अनेक गणिते या निवडणुकीवर अवलंबून होती. झालेल्या चुकांची दुरुस्ती जर वेळीच नाही केली तर पंकजा मुंडे यांना आगामी काळात कार्यकर्त्यांच्या गटबाजीचा मोठा फटका सहन करावा लागेल अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.
भाजपला भोवली अंतर्गत बंडाळी
By admin | Updated: September 16, 2015 00:39 IST