गरवारे क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासनाने संजय केणेकर यांना निमंत्रण पत्रिका दिली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी केणेकर आणि पदाधिकारी शनिवारी दुपारी कारने जात होते. भाजपने आधीच मुख्यमंत्र्यांविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि पथकाने केणेकर यांना ताब्यात घेतले. ही बाब शहरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळताच आमदार अतुल सावे, बापू घडामोडे, कुणाल मराठे, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, गणेश इधाटे, रामचंद्र नरोटे, महिला पदाधिकारी मनीषा भंसाळी, पूजा सोनवणे पाटील, संगीता जाधव, लता सरदार, मीना मिसाळ, छाया खाजेकर, सुवर्णा धानोरकर, प्रतिभा जऱ्हाड, सुवर्णा तुपे आदींसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
=============
पोलिसांवर गुन्हे नोंदवा - अतुल सावे
सनदशीर मार्गाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या केणेकर यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंदवा, अशी मागणी यावेळी आमदार अतुल सावे यांनी केली.