दत्ता थोरे , लातूर मागच्या वेळी साडेसहा हजाराने पडल्याचे उट्टे भाजपा आणि विशेषत: भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांनी दोन लाख ५३ हजाराची लिड घेऊन काढले. गतवेळच्या काठावरच्या पराभवाची दणदणीत पतरफेड करीत भाजपा उमेदवाराने घेतलेले मताधिक्य काँग्रेस नेत्यांची झोप उडविणारे आहे. भाजपाच्या उमेदवार सुनील गाकयवाड यांचे ना संस्थापक जाळे, ना सहकारात कार्य, ना कार्यकर्त्यांचे नेटवर्क. पण तरीही त्यांनी मतांच्या आघडीत मिळविलेले घवघवीत यश खुद्द भाजपालाही आश्चर्यकारक आहे. मोदी लाटेवर विजय मिळविला असे मानले तरी अडीच लाखाचे मताधिक्य एकट्या मोदी लाटेवर अशक्य वाटते. यात स्थानिक काँग्रेस नेत्यांविरुध्दची नाराजीही लपलेल्याचा वास आहे. लातूर हा मतदारसंघ वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. शिवराज पाटील यांनी लोकसभेला सलग सात विजय इथे साजरे केले. रुपाताई एकदा आणि आता डॉ. सुनील गायकवाड एकदा अशा दोन वेळीच भाजपाचा झेंडा फडकला. रुपातार्इंनाही ज्या आघाडीने काँग्रेसला पराभूत करता आले नाही त्या आघाडीने गायकवाडांनी काँग्रेसला चांगलाच दणका दिला. स्व. विलासरावांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक काँग्रेसला फलदायी ठरली नाही. देशमुखांच्या तीन साखर कारखान्यांचा ग्रीन शुगर बेल्ट असूनही आणि शहरात देशमुखी वर्चस्वाचा करिष्मा असूनही भाजपाने लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये घेतलेले मताधिक्य धक्कादायक आहे. अहमदपूरला दोन मुख्य नेते काँग्रेस-राष्टÑवादीत आहेत. माजी मंत्री विनायकराव पाटील आणि आ. बाबासाहेब पाटील. परंतु तिथे मजबूत ‘आघाडी’ असूनही भाजपाने मतांच्या आघाडीत मात्र धक्का दिला. ५६४५९ मतांची आघाडी भाजपाच्या पारड्यात पडली़ उदगीरला आमदारच भाजपाचे. परंतु विद्यमान आमदाराचेच लोकसभेला तिकिट कापल्याने भाजपात नाराजी होती. काँग्रेसचा या नाराजीवर डोळा होता. परंतु ती नाराजी मतदारसंघात भाजपाला मिळालेल्या मताधिक्यातून जराही दिसलीनाही. इथे काँग्रेसकडे बसवराज पाटील नागराळकर, पंचवीसपेक्षा जास्त वर्षे नगराध्यक्षपदावर मांड ठेवलेले राजेश्वर निटुरे आणि रस्त्याच्या विकासालाही पायलीभर पत्रके काढणारे माजी आमदार चंद्रशेखर भोसले या त्रिकुटांनी पक्षाची निराशा केली. उदगीरात मुस्लिम समाज मोठा असूनही काँग्रेसला ‘मोदी लाटे’त आलेले अपयश धक्कादायक आहे. उदगीरमधून ४६७९८ मतांची आघाडी भाजपाला मिळाली़ निलंगा तर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे गाव. ५० वर्षे इथे शिवाजीरावांची चलती आहे़ पण हुकुमत चालली ती त्यांचे नातू संभाजीराव निलंगेकरांची. आ. अमित देशमुखांकडे असलेल्या नेतृत्वामुळे शिवाजीरावांच्या ऐवजी अशोकरावांचे जास्तीचे प्रचारासाठी मंचावरून वावरणे काँग्रेसला महागात पडले. त्यात सुनील गायकवाडांच्या उमेदवारीपासून विजयापर्यंतचे शिवधनुष्य संभाजीराव पाटील यांनी उचललेले. अभय साळुंकेंच्या मनसेला उमेदवार नव्हता़ त्यामुळे भाजपाला सारे रान मोकळे मिळाले. ५० हजार ६६२ मतांची आघाडी संभाजीरावांनी भाजपाला मिळवून दिली़ इतकी आघाडी तर त्यांना मातोश्री रुपाताई निलंगेकर लोकसभेला थांबल्या तेव्हाही मिळविता आली नव्हती़ आश्चर्य वाटते ते लातूर शहराचे. शहरही कधी भाजपाच्या पारड्यात फिरले नव्हते. परंतु यंदा हासुध्दा चमत्कार पहायला मिळाला. जिल्ह्यात सर्वाधिक समस्या लातूर शहरात आहेत. महिनोमहिने असलेला कचर्याचा प्रलंबित प्रश्न, पाणीटंचाई, अस्थिर व गोंधळी महापालिका, ट्रॅफीकच्या अडचणी, अतिक्रमणे असे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. महापालिकेवरचा राग थेट आमदार असलेल्या अमितरावांवर पडतोय. हीच बाब भाजपाच्या पथ्यावर पडली. शिवाय आ. अमित देशमुखांकडून नागरिकांच्या प्रति विलासराव म्हणून व्यक्त केल्या जाणार्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होत नाहीत. ही त्यांची आणि मतदारांची दोघांची अडचण आहे. तरी शहरातून मिळालेले मताधिक्य अवघ्या १२ हजाराचे आहे, हीच काय ती जमेची बाजू़ आता या पराभवानंतर काँग्रेस नेते काय बोध घेतात याकडे डोळे आहेत. काँग्रेसला इथे धक्कादायक पराभवाला यापूर्वीही सामोरे जावे लागले आहे. पण आघाडी इतकी नसायची. आता या ठेचेतून नेते कसे पक्ष सावरतात, हे पहावे लागेल. सारीकडे पिछाडीच पिछाडी... लातूर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा, लोहा कंधार अशा सहाही ठिकाणी काँग्रेसला पिछाडीवर रहावे लागले. काँग्रेसने प्रचार शिस्तबध्द केला. पण जुनून नव्हता. भाजपाने केलेल्या थोडक्या प्रचारातही एक प्रकारची विलक्षण जान होती. चाकूरकर गटाला मानपान नाही.. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातुरात चाकूरकर गट हा काँग्रेसच्या प्रचारयंत्रणेपासून जणू अलिप्त दिसला. अर्चनाताई पाटील या सुशिलकुमार शिंदे, नारायण राणे आणि राहूल गांधी यांच्या सभांच्या दरम्यान जिल्ह्यातच होत्या. परंतु त्यांना या सभांना कुणी बोलाविलेच नाही, असे खात्रीलायक वृत्त आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यक्रम पत्रिकांवर राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकरांचे छायाचित्र छापण्यात आले होते. कायदेशीर अडचण असूनही छायाचित्र झळकते आणि दुसरीकडे निमंत्रणे नसणे ही दुहेरी खेळी कशी काय झाली ? याची जिल्हाभर चर्चा आहे. खा. मुंडेंचा मैत्र करार संपला..? लातूर आणि परळी यांचे नाते अतूट होते. खा. गोपीनाथ मुंडे आणि स्व. विलासराव देशमुख यांची मैत्री या नात्याची मुख्य धागा होती. रेणापूर विधानसभा मतदारसंघ असताना खा. मुंडे यांच्यापाठीमागे देशमुखांची अदृश्य शक्ती पाठीमागे असायची. आणि जिल्ह्याच्या राजकारणात खा. मुंडेंची भाजपा देशमुखांसाठी मैत्रकरारासारखी काम करायची. परंतु स्व. विलासरावांच्या निधनानंतर या मैत्र कराराला ब्रेक लागल्याची कुणकुण आहे. त्यामुळेच की काय रेणापूरमधून भाजपाला आघाडी मिळालीच. शिवाय लोहा-कंधारला केशवअण्णा धोंडगे - गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर चित्र व वारे दोन्ही बदलले. सहा विधानसभा मतदारसंघापैैकी भाजपाला लोहा-कंधार, निलंगा, अहमदपूर या तीन विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे़ भाजपाच्या अडीच लाखांच्या आघाडीत या तीन मतदारसंघांचा वरचष्मा दिसतो़ भाजपाला लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन काँग्रेसच्या बालेकिल्लयात सर्वात कमी आघाडी आहे़ परंतु, या दोन ठिकाणी स्व़विलासरावांच्या नंतर होणार्या पहिल्या निवडणुकीत भाजपाला मताधिक्य मिळणे मुळात हीच बाब धक्कादायक आहे़ संपूर्ण मतदारसंघात सेनेचे फारसे अस्तित्व दिसून येत नाही़ बहुतांश पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका काँग्रेसकडे असताना मोदी लाटेने चमत्कार घडविला़
भाजपाने केला हिशेब चुकता..!
By admin | Updated: May 18, 2014 00:48 IST