औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांना फोन केल्यामुळे त्यांनी कंपनीच्या कार्यालयातच ठिय्या दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीदेखील आंदोलनास साथ दिली. कंपनीने तीन तास चाललेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी कंपनी बेकायदेशीररीत्या पाणीपट्टी वसुली करीत असल्याची तक्रार पोलिसांत दिली. काल २५ रोजी विधानसभेत आ. अतुल सावे यांनी समांतर जलवाहिनीच्या चौकशीची मागणी केली. त्याचे पडसाद आज कंपनीवर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रुपाने उमटले. कंपनीच्या कार्यालयाकडून पाणीपट्टी भरलेली असताना नगरसेवकांना फोन जाताच त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. शिवसेना आणि भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून समांतर जलवाहिनीवरून राजकारण सुरू आहे. मनपा निवडणुकीत समांतरचा मुद्दा सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्या पार्श्वभूमीवरच भाजपने योजनेच्या कामावर आणि पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. पालकमंत्री रामदास कदम यांनी ८ ते २६ जानेवारीदरम्यान समांतर जलवाहिनीच्या कामावरून तीन बैठका घेतल्या. पाणीपट्टी वसुलीचे काम कंपनीकडून काढून घ्यावे. ते मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच करावे, असे आदेशही त्यांनी आयुक्त व महापौरांना दिले. महापौरांनी फेबु्रवारीमध्ये झालेल्या सभेतही कंपनीला पाणीपट्टी वसुली थांबविण्याचे आदेश दिले. तरीही कंपनी वसुली करीत असल्यामुळे नगरसेवक प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा, काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी, बालाजी मुंडे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मनपाच्या अभियंत्यांनीदेखील आचारसंहितेमुळे नगरसेवकांना दाद दिली नाही. सहा वाजेपर्यंत नगरसेवक कंपनीच्या एन-१ येथील कार्यालयात ठाण मांडून होते. व्यवसाय प्रमुख अर्णव घोष किंवा इतर अधिकारी कंपनीकडे आला नाही. कार्यकारी अभियंता कोल्हे यांनीही नगरसेवकांचे फोन घेतले नाहीत. कंपनीचे अधिकारी गुप्ता यांना विचारणा करण्यात आली की, कोणत्या कायद्यानुसार ही वसुली सुरू आहे? त्यांना काहीही उत्तर देता आले नाही.
समांतरविरोधात भाजप पेटले!
By admin | Updated: March 27, 2015 00:44 IST