राजेश गंगमवार, बिलोलीमराठवाडा-तेलंगणा सीमेवर उभारण्यात आलेल्या ५० कोटी प्रकल्पाच्या योजनेला उद्घाटनाची प्रतीक्षा लागली असून लोकसभा निवडणूकपूर्वी पूर्ण झालेल्या बिलोली बॉर्डर चेकपोस्टचा मुहूर्त रखडला आहे़ दरम्यान, प्रत्येक मालवाहू वाहनांची आॅनलाईन तपासणी होणार असल्याने आतापासूनच वाहनांची संख्या रोडावली आहे़बिलोलीहून तेलंगणाकडे जाणाऱ्या सीमेवर महाराष्ट्र शासनाने पाच वर्षापूर्वी बॉर्डर चेकपोस्टचा प्रकल्प हाती घेतला़ कार्ला-फाटा (सगरोळी) येथे ३५ एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली़ शासन नियमानुसार वेगवेगळ्या कंपनीला विविध कामांचा ठेका देण्यात आला़ सदरील चेकपोस्टवर प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे़ इंटरनेट, पारदर्शक, आॅनलाईन तपासणीमुळे वाहनांमध्ये कोणते साहित्य आहे हे लगेच संगणकावर दिसणार आहे़ बॉर्डर चेकपोस्ट सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत असल्याने चेक पोस्टवर काय काय घडामोडी, हालचाली होतात हे थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयात दिसणार आहे़ आरटीओचे कार्यालय, विक्रीकर खात्याचे कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग पाठोपाठ जंगल वनरक्षक विभागाचीही शाखा येथे असेल़ प्रत्येक वाहनांसाठी साठ टनपर्यंत क्षमता असलेल्या वाहनाचे वजन येथे केले जाणार आहे़ सदरील प्रक्रियेसाठी प्रत्येक वाहनांना नियमानुसार शुल्क भरावे लागतील़ सदरील चेकपोस्टवर दुतर्फा गेट बसवण्यात आले़ तपासणी चुकवून एकाही वाहनाला जाता येणार नाही़ अद्ययावत चेकपोस्टची रचना करण्यात आली असून वाहनधारकांना विसावा घेण्यासाठी सुंदर बगीचाही निर्माण करण्यात आला आहे़ हॉटेल, झेरॉक्स, स्टेशनरी अशी लहान-सहान दुकानांचीही निर्मिती करण्यात आली़ वाहनात क्षमतेपेक्षा जास्तीचा माल झाल्यास गोदाम-लॉकरची देखील व्यवस्था करण्यात आली़ प्रत्येक वाहनांचे पाच कार्यालयामार्फत तपासणी केली जाणार असून वाहनाला संगणक कोडनंबर चिटकवण्यात येईल, ज्यामुळे आॅनलाईनवरच सदरील ट्रकची सर्व माहिती कळेल़ ५० कोटी खर्च करून उभारण्यात ंआलेली योजना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच पूर्ण झाली़ पण आचारसंहितामुळे उद्घाटन झाले नाही़ १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी मुहूर्त होईल असे समजले पण पुन्हा मागे पडले़ आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सध्यातरी काहीच हालचाली दिसून येत नाहीत़ परिणामी आता २०१४च्या वर्षअखेर अथवा जानेवारीतच मुहूर्त होईल असे दिसते़ अद्ययावत चेकपोस्ट पूर्ण झाल्याने प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू आहे, असा चुकीचा संदेश वाहनधारकांत गेला़ परिणामी उत्तर भारतातून दक्षिण भारतात तर कन्याकुमारीपासून दिल्लीकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी बिलोली चेकपोस्टवरून जाण्या-येण्याचा मार्ग बदलल्याचे चित्र पुढे आले आहे़ हैदराबाद, मद्रास, कन्याकुमारीपर्यंत जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे़ दरम्यान वाहन तपासणीच्या धास्तीने भोकर बॉर्डर व देगलूर सीमा असा प्रवास करण्यासाठी वाहन सरसावले आहेत़ एकंदर भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होवून वाहनधारक मार्ग बदलतील असे चित्र पुढे आले़
बिलोली बॉर्डर चेकपोस्टचे उद्घाटन रखडले
By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST