वाळूजमहानगर : अपघातानंतर रस्त्यावर उभी केलेली तरुणाची दुचाकी चोरट्याने लांबविल्याची घटना सिडको वाळूजमहानगरात घडली. सुहास छगन साळुंके (रा.औरंगपुरा) हा ७ नोव्हेंबरला दुचाकी (एम.एच.२०, डी.एम.७२९८) ने घरी जात असताना अपघात झाला होता. या अपघातानंतर सुहासने सिडको वाळूजमहानगरजवळ दुचाकी उभी केली व रुग्णालयात गेला. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
------------------------
पंढरपुरात विजेचा लंपडाव
वाळूजमहानगर : पंढरपुरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यावसायिक व वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना न देता वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यानंतर तासनतास वीज येत नसल्यामुळे सर्वच ठप्प होते.
------------------------
कृष्णानगरात सांडपाणी रस्त्यावर
वाळूजमहानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगरात नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचत असल्यामुळे वादविवादाच्या घटनाही घडत आहेत. नाल्या तुडुंब भरल्या असून या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या भागातील नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
------------------------
पार्किंगमधुन दुचाकी लांबविली
वाळूजमहानगर : बजाज कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख नावीद अ.मोहसीन (रा.हर्सूल) हे ८ डिसेंबरला दुचाकीने (एम.एच.२०, ईआर ६७१६) बजाज कंपनीत नाईट शिफ्टमध्ये कामासाठी आले होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली.
------------------------
रांजणगावात मोकाट जनावरे रस्त्यावर
वाळूजमहानगर : रांजणगावात मुख्य रस्ते व नागरी वसाहतीत मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालय, सावतानगर, शिक्षक कॉलनी आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
------------------------
साजापूर फाट्यावरील जड वाहने हटवा
वाळूजमहानगर : साजापूर फाट्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंने जड वाहने उभी राहत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. औद्योगिक क्षेत्रात मालाची ने-आण करणारी जड वाहने या फाट्यावर उभी केली जात असल्यामुळे रस्ताही अरुंद झाला आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या कामगार व वाहनधारकांना या जड वाहनामुळे कसरत करावी लागते. या फाट्यावर जड वाहनामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही घडले आहेत. सदरील जड वाहने हटविण्याची मागणी निलेश सुतार, अविनाश शेळके, कृष्णा जाधव यांनी केली आहे.
------------------------
ईएसआय रुग्णालयासमोर कचरा
वाळूजमहानगर : पंढरपूरच्या ईएसआय रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. या परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिक जमा झालेला केरकचरा रुग्णालयाच्या बाजूला टाकतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उघड्यावर केरकचरा टाकणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
------------------------
नारायणपूर रस्त्याची दुरवस्था
वाळूजमहानगर : वाळूज ते नारायणपूर या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अनेकांनी नळजोडणीसाठी खोदकाम केले आहे. मात्र, खोदकामानंतर रस्ता पूर्ववत केला नाही. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी राजू शेळके, अखिल शेख आदींनी केली.
------------------------