श्यामकुमार पुरे , सिल्लोड : दोन वर्षांपासून कल्याण-मुंबई मटका (सट्टा) बंद असल्याचा गाजावाजा पोलीस करीत असले तरी हा मटका जिल्हाभर बिनधास्त सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे याची आधुनिक पद्धत झपाट्याने पुढे येत असून चिठ्ठ्यांवरील आकडे लावण्याची पद्धत बंद होऊन मोबाईलवर सट्टा खेळला जात आहे. अशा सटोरींना हुडकून मोबाईलवर चालणारा सट्टा बंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० ते ५० गावे येतात. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच बुकी सट्टा चालवितात. त्याच्या हाताखाली रोजाने माणसे असतात. या बुकींच्या वर एक उतारी खाणारा असतो. तो केवळ फोनवर उतारी घेतो. ही उतारी हजारो, लाखोंमध्ये असते. या व्यवसायातून एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १० ते १५ लाखांची उलाढाल होते. ओपन, क्लोज, जोड, पाना, संगम, एसपी, डीपी, पाना अशा प्रकारे हा सट्टा चालतो. मुंबई- कल्याण, मिलन, टाईम नावाचे विविध जुगार सुरू आहेत. सटोरी केवळ सट्टाच खेळतात. एका गावात नसेल तर दुसऱ्या गावात जातात. आता तर मोबाईलवर आकडे दिले जातात, त्यामुळे कुठे जायची गरजही पडत नाही. बुकीला आधी पैसे द्यावे लागतात. एखाद्या व्यक्तीचा चेक बाऊन्स होईल; पण सट्ट्याचे पैसे बुडत नाही. हे या धंद्याचे वैशिष्ट्य (इमानदारी) असल्याने हा धंदा या काळातही टिकून आहे. आधी चिठ्ठीवर लहान मुलाला पाठविले तरी बुकी व एजंट पैसे द्यायचे. आता मोबाईलवर आकडा सांगा, हे केवळ देणारा व घेणाऱ्यालाच माहीत असते; पण तरी तो आकडा लागला की बुकी त्या सटोरीचे पैसे घरपोच पाठवतो.
चिठ्ठीवरील सट्टा आता मोबाईलवर
By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST