औरंगाबाद : एका बालकाची २१ गिअरची महागडी सायकल २० ऑगस्ट रोजी चोरीला गेली. सायकलचा तपास करताना पोलिसांच्या हाती अट्टल गुन्हेगार लागला. या चोरट्याकडून महागड्या सायकलीसह दोन दुचाकी, एसी पोलिसांनी जप्त केला. सय्यद हनिफ ऊर्फ सय्यद हबीब (रा. शरीफ कॉलनी) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे.
सय्यद अली सफदर सय्यद हनिफ (४६, रा. हिना नगर) यांचा १३ वर्षीय मुलागा २० ऑगस्ट रोजी सायंकाळी आजोबा शहेनशाह अली यांना भेटण्यासाठी सायकलीवर युनुस कॉलनी, मोतीवाला फंक्शन हॉल जवळ गेला होता. त्यावेळी त्याने सायकल घरासमोर उभी केली होती. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास घराकडे जाण्यासाठी निघाला असता त्याला सायकल घरासमोर दिसली नाही. सय्यद यांनी मोतीवाला हॉल व आजूबाजूच्या परिसरात सायकलचा शोध घेतला मात्र, ती कुठेही दिसली नाही. मुलाची महागडी २१ गिअरची सायकल चोरीला गेल्याने त्यांनी २१ ऑगस्ट रोजी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर जिन्सीच्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सरवर शेख यांना ती सायकल अट्टल गुन्हेगार सय्यद हबीबने चोरल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी कटकट गेट भागातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
शरीफ कॉलनीतील त्याच्या घराची झडती घेतली त्यात पोलिसांना सायकल, दोन दुचाकी आणि दोन एसी असा १ लाख १५ हजारांचा ऐवज आढळला. मोपेड (एमएच-२०-सीजी-९९२९), स्प्लेंडर (एमएच- १८- एके-६९२७) असे जप्त दुचाकीचे क्रमांक आहेत. सय्यद हनीफ विरुध्द चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी सारखे गुन्हे अगोदरच दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे, उपनिरीक्षक सरवर शेख, सहायक फौजदार संपत राठोड, हकीम शेख, सुनील जाधव, संतोष बमनात, जफर पठाण यांनी केली.