परंडा : परंड्याहून बार्शीकडे जाताना हिंगणगाव-उपळाई पाटीजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात २१ वर्षीय युवक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली.ताहेर शेख (वय २१) व शाहरुख शिकीलकर (वय २०) हे दोघे बुधवारी दुपारी मोटार सायकलवरुन परंड्याहून बार्शीला जात होते. परंडा-बार्शी राज्य मार्गावरील हिंगणगाव-उपळाई पाटीजवळ दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास समोरुन आलेल्या दुचाकीस जोराची धडक बसली. या अपघातात ताहेर शेख यांच्या डोक्यास, तोंडास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शाहरुख शिकीलकर व समोरील दुचाकीस्वार (रा. जामगाव) यांच्या पायाचे हाड मोडल्याने तेही गंभीर जखमी झाले. सुदैवाने जामगावहून येणाऱ्या दुचाकीवरील पाठिमागे बसलेली महिला व चारवर्षीय मूल यामध्ये बचावले. गंभीर जखमींना तात्काळ बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (वार्ताहर)अपघातानंतर मृत पावलेला ताहेर यांचा मृतदेह दोन तास रस्त्यावरच पडून होता. यानंतर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला असून, गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. ताहेर याच्या वडिलाचे १५ वर्षांपूर्वी अजमेर (राजस्थान) येथे गेले असता त्यांचे निधन झाले होते. ताहेरच्या पश्चात आई आहे.
दुचाकी अपघात; युवक जागीच ठार
By admin | Updated: February 19, 2015 00:44 IST