आशपाक पठाण लातूरनिवडणुका आल्या की लातूर शहरात शादीखान्याचा विषय चर्चेत येतो़ गेल्या १५ वर्षांपासून शादीखान्याची मागणी होत असताना गत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शहरातील लाल गोडाऊन येथे प्रस्तावित असलेल्या शादीखाना इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान यांच्या हस्ते झाले़ ७ आॅगस्ट २०१४ रोजी भूमिपूजन झालेल्या या इमारतीचे इमले तब्बल दोन वर्षे लोटले तरी अद्यापही हवेतच़लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्याने आता सत्ताधाऱ्यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा फार्स आवळला आहे़ विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घाईघाईत शादीखान्याच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी शादीखान्याची इमारत भव्य दिव्य असावी, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशा घोषणाही करण्यात आल्या़ ७ आॅगस्ट २०१४ साली झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर इथे कोणी फिरकलेही नाही़ उलट शादीखाना नव्हे मंगल कार्यालय यावर वादंग झाले़ बांधकामासाठी निधीची कसलीही तरतूद नसताना भूमिपूजन करण्यात आले़ त्यानंतर महापालिका प्रशासनाने अल्पसंख्यांक योजनेतून शादीखाना बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव तयार करून पाठविला़ तांत्रिक दोष दाखवून शासनाकडून सदरील प्रस्ताव परत आला़ सध्या अण्णा भाऊ साठे चौकात असलेल्या लाल गोडाऊन येथील शादीखान्याच्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात आहे़ जागा रिकामी असल्याने दुर्गंधी पसरली आहे़ मुख्य रस्त्यालगत असलेल्या या जागेवर भूमिपूजनानंतर कोनशिलेचा फलक काही दिवस दिसला़ आता तो फलकही गळून पडला आहे़ प्रस्तावित असलेल्या जागेवर बांधकाम सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले़ आता मनपाच्या निवडणुका आल्याने शहरात सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे, त्यात पुन्हा एकदा रखडलेल्या शादीखान्याचा विषय चर्चेत आला आहे़
भूमिपूजनानंतर शादीखाना इमारतीची इमले हवेतच !
By admin | Updated: December 24, 2016 21:31 IST